पालघर -नालासोपारा पूर्वेकडील चंदन नाका येथे प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्याचे धागेदोरे शोधण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. त्या महिलेची हत्या करून नंतर अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नालासोपारामधील 'त्या' महिलेची आधी हत्या, नंतर अत्याचार - नालासोपारा क्राईम न्यूज
नालासोपारा येथील महिलेची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. नालासोपारा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
संबंधित महिला २७ जूनला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला असता, त्यांना प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला एक मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. त्यामध्ये संबंधित महिला २६ जूनला काही सामान आणण्यासाठी बाहेर गेली होती. त्यावेळी प्रेम नॉव्हेल्टी स्टेशनरी अँड कॉस्मेटीक गिफ्टच्या दुकानाता शिवा चौधरी याच्याशी किमतीवरून बाचाबाची झाली. त्यावेळी त्याने केसांना धरून दुकानाच्या आतील खोलीत तिला नेले. तिचा गळा दाबून चाकूने वार केला. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. तिचा मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत गुंडाळून रात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास खांद्यावर घेऊन चंदन नाका येथील एका बंद असलेल्या टेम्पोमध्ये टाकला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी शिवा चौधरी याला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित कारवाई नालासोपारा पोलीस उपअधीक्षक अमोल मांडवे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर, सुहास कांबळे, संजय नवले, प्रशांत पाटील, मनोज सकपाळ यांनी केली.