माणुसकीचा अंत..! रुग्णालयाबाहेरच 'त्याचा' तडफडून मृत्यू - बेवारस रुग्णाचा मृत्यू
गेल्या दोन दिवसांपासून हा व्यक्ती रुग्णालयाच्या बाजूलाच तडफडत अवस्थेत पडून होता. त्यावर उपचार व्हावे यासाठी स्थानिक नागरिक व दुकानदारांनी याची माहिती रुग्णालय कर्मचाऱ्यांना अनेक वेळा दिली होती. मात्र रुग्णालयातील कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही. अखेर त्याचा मृत्यू झाला आहे.
नालासोपारा (पालघर) - नालासोपाऱ्यात रुग्णालयाबाहेर एका बेवारस व्यक्तीचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती भाजलेल्या अवस्थेत पाच दिवस रुग्णालयाबाहेर पडून होता. तसेच या रुग्णाबाबत येथील दुकानदारांनी रुग्णालयाला माहिती दिली होती. मात्र रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे अखेर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. माणुसकीला काळिमा फासणारी या घटनेवरून रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
मृत व्यक्ती हा एक आठवडाभरापासून या परिसरात वावरत होता. तो अंध असून जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती दुकानदारांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून हा व्यक्ती रुग्णालयाच्या बाजूलाच तडफडत अवस्थेत पडून होता. त्यावर उपचार व्हावे यासाठी स्थानिक नागरिक व दुकानदारांनी याची माहिती रुग्णालय कर्मचाऱ्यांना अनेक वेळा दिली होती. मात्र रुग्णालयातील कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही. शेवटी रविवारी मुसळधार पावसातच रात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. रात्रीपासून हा मृतदेह रुग्णालयाच्या बाजूला बेवारस अवस्थेत पडला होता.
वसई विरारमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. तर 5 हजार 959 एवढे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. नालासोपारा हा कोरोनाचा हॉटस्पॉट आहे, अशा अवस्थेत बेवारस मृतदेह रुग्णालयाच्या बाजूला पडून असल्याने स्थानिक नागरिक भीतीही व्यक्त करत आहेत.