पालघर (विरार) :मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या शेजारील विरारच्या काशीद कोपरगावातील ग्रामस्थ दरड कोसळण्याच्या भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. या गावाच्या डोक्यावरच असलेल्या डोंगरावर एमएमआरडीए पाण्याची टाकी बनविण्याचे काम करत आहे. या कामात डोंगरवर मोठ्या प्रमाणात खोदकाम झाल्याने हा डोंगर कोसळून कधीही गाव नष्ट होण्याची भीती, इथल्या ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. रात्री कधीही डोंगर कोसळेल व सर्वच संपेल या भीतीने रात्रभर झोप येत नसल्याचे ग्रामस्थ हंबरडा फोडून सांगत आहेत.
ग्रामस्थांवर केले गुन्हे दाखल : डोंगराच्या खोदकामाला ग्रामस्थांनी यापूर्वी विरोध केला होता. त्यानंतर मोठे आंदोलन केले होते. तरीदेखील प्रशासनाने न जुमानता शेकडोहून अधिक ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले होते. सरकारने आम्ही आहोत तोपर्यंत तरी आमच्यावर लक्ष द्यायला हवे, अन्यथा आमचे अस्तित्वच नष्ट होईल, अशी वेळ येऊ देऊ नका, असे मत काशीद कोपरचे ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
गावाचे स्थलांतरित करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : विरारच्या काशीद कोपरगावात अडीच हजार लोक वस्ती आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर आता डोंगरी भागात वस्ती स्थलांतरित करण्याचे काम वसई विरार महापालिका व प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या गावाचे स्थलांतरित करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. एकंदरीत इर्शाळवाडीच्या दुर्घनेनंतर काशीद कोपरगाव भीतीच्या सावटाखाली आले आहे.
मदत व बचावकार्य सुरूच : महाराष्ट्रातील रायगडमधील इर्शाळवाडीत 19 जुलै राजी दरड कोसळल्याची घटना घडली होती. घटनास्थळी तेव्हापासून मदत व बचावकार्य सुरू आहे. आज बचावकार्याचा पाचवा दिवस आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील दुर्घटनेतील मृतांची संख्या 27 वर पोहोचली आहे.
हेही वाचा-
- Shambhuraj Desai : डोंगर भागातील नागरिकांना तात्काळ स्थलांतरित करा; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आदेश
- Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेतील रेस्क्यू ऑपरेशन अखेर थांबवले; अद्यापही 57 बेपत्ता, 27 मृत्यू
- Raigad landslide: रायगडमधील इर्शाळवाडी दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू, अद्याप 81 जण बेपत्ता, चौथ्या दिवशीही सुरू राहणार बचावकार्य