पालघर :पालघर कोरेगाव येथील समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत आढळून आलेल्या कासवावर उपचार करून त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात डहाणू वनविभाग आणि कासव उपचार केंद्राने यश मिळवले आहे. अवघ्या दीड महिन्यात कासवावर यशस्वीपणे उपचार करून जीवदान दिले आहे. तर समुद्र किनाऱ्यावर आढळणाऱ्या कासवांच्या सुरक्षेसाठी कासव मित्रांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
जखमी कासवांना डहाणूतील कासव उपचार केंद्रात आश्रय :कोरेगाव समुद्रकिनाऱ्यावर दुर्मीळ अशा 'लॉगरहेड' प्रजातीचे समुद्रीकासव आढळून आले. कांदळवन कक्षाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच कांदळवन कक्षाने कासवाला उपचारासाठी डहाणू येथील कासव उपचार केंद्रात पाठवले. साधारण दीड महिन्याच्या उपचारांनंतर हे कासव समुद्रात सोडण्यासाठी सुदृढ झाले असून, त्याला समुद्रात सोडण्यात आले, अशी माहिती कासव उपचार केंद्राचे डॉ. दिनेश वीन्हेरकर यांनी दिली आहे.
डहाणू येथील कासव उपचार केंद्रात एकूण 19 कासवे :गेल्या वर्षभरात डहाणू येथील कासव उपचार केंद्रात एकूण 19 कासवे उपचारासाठी आली होती. यातील बरीच कासवे अतिगंभीर जखमी असून, यातील 10 कासवांवर यशस्वीरित्या उपचार करून त्यांना समुद्रात सोडण्यात यश आले आहे. तर सात कासवांची प्रकृती खूपच नाजूक असल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच, सध्या चार कासवे उपचार केंद्रात उपचार घेत असून, त्यांचे 2 पेक्षा जास्त पर निकामी झाले असल्यामुळे त्यांना समुद्रात सोडता येणार नसून, त्यांची सेवा शुश्रुषा उपचार केंद्रातच करण्यात येणार आहे.