पालघर - डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी देवीची यात्रा कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये, यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार डहाणू प्रांताधिकारी सौरभ कटीयार यांच्या अध्यक्षतेखाली महालक्ष्मी मंदिर कार्यलयात शासकीय यंत्रणा व ट्रस्ट पदाधिकारी यांच्या उपस्थितीत यात्रेसंदर्भात सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डहाणूतील प्रसिद्ध 'महालक्ष्मी यात्रा' रद्द हेही वाचा...VIDEO : कोरोनाचा धसका, कोल्हापूरात बाजूने जाताना शिंकल्यामुळे एकाला बेदम मारहाण
डहाणूची प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रा दरवर्षी चैत्र पौर्णिमेला सुरू होते. सतत 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेत दरवर्षी जिल्ह्यातील भाविकांबरोबर मुंबई, ठाणे आणि गुजरात राज्यातील लाखो भाविक येतात. पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध प्रकारची दुकाने, करमणूकीचे खेळ, खाद्य पदार्थ, आकाश पाळणे आदी दुकाने थाटली जातात. ही यात्रा 8 एप्रिल पासुन सुरू होणार होती. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे राज्यात शाळा, कॉलेज यांना सुट्टी जाहीर केली असून पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, सामजिक कार्यक्रम इत्यादींवर बंदी आणली आहे.
पालघर जिल्हाधिकारी यांनी 31 मार्चपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्या अनुषंगाने कोरोनाबाबत खबरदारी म्हणून 31 मार्चपर्यंत भाविकांना मंदिरातील दर्शन बंद करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचा प्रसार आणि महालक्ष्मी यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता आंतरीक पूजा वगळता, खबरदारीसाठी ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा...कोरोनाचा धसका : आखाती देशातून 26 हजार भारतीय मुंबईत परतणार, होम क्वारेंटाईनसाठी बिल्डरांच्या रिक्त इमारतींचा वापर