पालघर-सध्या राज्यभरात पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. पालघर तालुक्यातील सफाळे, तांदुळवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे शेतात उभे भात पिक आडवे झाले आहे. तर अनेक ठिकाणी कापणी करून ठेवलेल्या पिकाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोडांशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
पालघर तालुक्यात पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान, बळीराजा संकटात - palghar rain news
पालघर तालुक्यातील सफाळे, तांदुळवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे शेतात उभे भात पिक आडवे झाले आहे. तर अनेक ठिकाणी कापणी करून ठेवलेल्या पिकाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणी करून वाळत ठेवलेले भातपिक शेतात पाणी साचल्याने पाण्यावर तरंगू लागल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरुवात केली. सध्या भात कापणीची सुरुवात झाली होती आणि अनेक शेतकऱ्यांनी भात कापणी करून शेतात ठेवले होते. मात्र बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कर्नाटकसह महाराष्ट्रावर अस्मानी संकट तयार झाले. पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. पालघर तालुक्यातील सफाळे, तांदुळवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कापणी करून वाळत ठेवलेले भातपिक शेतात पाणी साचल्याने पाण्यावर तरंगू लागल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. अनेक ठिकाणी शेतात उभे भातपिक पावसामुळे आडवे झाले आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकरी भरडला गेला होता. अशात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर पडली बळीराजा संकटात सापडला आहे. कृषी आणि महसूल विभागाकडून भातपिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.