विरार (पालघर)- अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आज पहाटे साडे पाच वाजल्यापासून लोकल ट्रेन सुरू करण्यात आली आहे. विरार ते चर्चगेट या ठिकाणी आजपासून सुरू झालेली लोकल सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व खासगी ,सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठीच असणार आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल सेवा सुरू असणार आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार आणि अप-डाऊन मार्गावर दिवसभरात 12 ट्रेनच्या माध्यमातून एकूण 120 फेऱ्या चालवण्यात येतील. सकाळी साडेपाच ते रात्री साडेअकरा या वेळेत पंधरा मिनिटांच्या अंतराने लोकल ट्रेन सोडण्यात येत आहेत.
लोकलमधून प्रवास करणारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी विरार ते चर्चगेट या मार्गावर सर्वाधिक वेळा लोकल चालवण्यात येणार आहेत. विरार-डहाणू मार्गावरही काही फेऱ्या चालवण्यात येतील. चर्चगेट बोरिवली या स्थानकादरम्यान सर्व ट्रेन जलद असतील तर बोरिवली नंतर सर्व ट्रेन साधारण गतीने धावतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनाहीमोठा दिलासा मिळाला आहे.
अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे लावून धरली होती. मुंबईमध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस, महापालिका कर्मचारी, खासगी रुग्णालयातील कर्मचारी तसेच शासकीय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील केली होती. अखेर रविवारी (दि. 14 जून) रात्री उशिरा अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्याला रेल्वेने मान्यता दिली.