पालघर :जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर निसर्गसौंदर्यांने नटलेल्या विवळवेढे गावी महालक्ष्मीचे स्थान ( Mahalakshmi Mata ) असून ते जागृत मानले जाते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर ध्वजस्तंभ असून त्यावर मोठा ध्वज सदैव फडकत असतो. मंदिराच्या समोर सभामंडप, दोन दीपमाळा असून त्यांच्या मध्ये मुख्य होमकुंड आहेत. मंदिराचा गाभारा पश्चिमाभिमुख आहे देवीचा मुखवटा दोन फूट उंचीचा लांबट चेहऱ्याचा असून शेंदूर चर्चित आहे देवीच्या मस्तकावर चांदीचा मुकुट आणि कुंडल आहेत मागील बाजूस भव्य पाषाण असून याच पाषाणात दर्शनी मुखवटा कोरुन काढला आहे. ( Mahalakshmi Mata Auspicious Goddess Of Palghar )
पालघरची नवसाला पावणारी महालक्ष्मी
एक दिवसाची भरते यात्रा : महालक्ष्मी माता ही आदिवासी समाजाची कुलदेवता आहे. तिच्याप्रती आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बारसी उत्सवाचे आयोजन केले जाते. भाद्रपदातील पितृपक्षात पितृबारस साजरी केली जाते. त्या दिवशी मंदिरात एक दिवसाची यात्रा भरते. सर्व आदिवासी बांधव आपल्या शेतात, माळात पिकणारी पिके, तांदूळ, काकड्या, डांगर, चवळी, खुरासन आदी देवीला नैवेद्य म्हणून दाखवतात. त्याआधी हे सगळे खुल्या परसात असूनही कुणी भक्षण करत नाही.
आदिवासींचे वाद्य पूजले जाते : पृथ्वीमाता ही आदिवासींची मुख्य देवता. त्यामुळे कुठलेही पिकवलेले नवीन धान्य, भाजीपाला देवीच्या नावाने वाहिल्याशिवाय तिचे भक्षण केले जात नाही. या खाण्यास ‘नवखाणे’ असेही म्हणतात. त्या दिवशी 'तारपा' हे आदिवासींचे वाद्य पूजले जाते. त्यांच्या तालावर नाचत नृत्यपूजा बांधली जाते. त्याआधी एकही आदिवासी कलाकार तारपा वाजवत नाही. दिवाळीनंतर तारपा बंद होतो. मग केवळ देवीच्या कार्यक्रमांनाच तारपानृत्य केले जाते. परंपरेनुसार सर्वप्रथम आदिवासी समाजातील सातवी कुटुंबीय महालक्ष्मी मातेची पूजा करतात. त्या दिवशी महालक्ष्मी मातेचे मंदिर भक्तांसाठी रात्रभर खुले असते.
विविध कार्यक्रमांचे आयोजन :नोकरीधंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेली आदिवासी मंडळी बारसी उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात. त्यानंतर येणारे ‘वाघबारस’ आणि ‘माहिबारस’ हे उत्सव पुजा-याच्या घरी साजरे केले जातात. दिवाळीनंतर 'वाघबारस' साजरी केली जाते. तिसरी 'माहिबारस'. ही माघ महिन्यातील शुद्ध द्वादशीला साजरी केली जाते. त्या दिवशी परिसरातल्या लहान देवदेवतांची पूजा केली जाते. बारशीत वंशपरंपरेने जतन केलेली जुनी, दुर्मीळ देवदेवतांची चित्रे पूजली जातात. पायथ्याजवळ असलेल्या मंदिरातील देवता पुजा-याच्या घरी नेऊन पुजल्या जातात. हा उत्सव पाच दिवस चालतो. प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्या दिवसांत भाविक पुजा-याच्या घरी जमून देवीची पूजा करतात.
या देवीला आहेऐतिहासिक महत्त्व :अकबर बादशहाच्या वेळी राजा तोरडमल येथे आला होता आणि त्यांनी देवीचे दर्शन घेतले अशी इतिहासात नोंद आहे. तसेच पंजाबचा राजा रणजीत सिंह यांनी पंजाब सर केल्यानंतर देवीची महापूजा करून मंदिरावर सोन्याचा कळस चढविला होता. असा इतिहासाचा दाखला आहे. महालक्ष्मी मातेची मूळ वास्तव्य तिथल्या मुसल्या डोंगरावर आहे. येथे आता मंदिर उभारण्यात आले आहे. या डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्यांचा रस्ता आहे साधारण सहाशे पायऱ्या चढून गडावरील मंदिराजवळ जावे लागते. चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या काळात येणाऱ्या यात्रेमध्ये महालक्ष्मी देवीला होमाच्या दिवशी जव्हारच्या राजघराण्याकडून प्रतिवर्षी खणा नारळाची ओटी भरून साडी चोळी अर्पण करून पाच मीटर लांब झेंडा चढविला जातो .ही प्रथा आजतागायत सुरू आहे. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून ही यात्रा सुरू होत असली तरी वर्षभर देवीचे बारसी नवरात्र आदी उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असतात.
देवीने दिला दृष्टांत : आख्यायिका महालक्ष्मी मातेच्या अनेक आख्यायिका असून, देवी डहाणूला स्थायिक कशी झाली याबाबत असे सांगितले जाते. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गुजरात मध्ये वास्तव्य करण्याची इच्छा झाली असता वाटेत विवळवेढे डोंगरा दरम्यान जात असताना विश्रांतीसाठी देवी मूसल्या डोंगराजवळ गेली. पुढे येतील कान्हा ठाकूर नावाच्या व्यक्तीला देवीने दृष्टांत दिला व पूजा करण्यास सांगितले. कान्हा ठाकूर मोठ्या श्रद्धेने पूजा करू लागले. त्यानंतर देवी डहाणूला विवळवेढे येथे स्थायिक झाल्याची नोंद पुरणात आहे. महालक्ष्मी देवीच्या प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात याबाबतचा मजकूर आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेला पहिला होमच्या दिवशी मध्यरात्री बारा वाजता पुजारी ध्वज पूजेचे सामान नारळ घेऊन वेगाने पायथ्याच्या मंदिरापासून धावत निघतो मध्यरात्री तीन वाजता तो डोंगरावर चढतो. तिथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकवतो व सकाळी परत येतो हे दृश्य पाहण्यासाठी या मार्गावर मध्यरात्रीच्या वेळेस असंख्य भाविक त्या पुजारीच्या प्रतीक्षेत बसलेले असतात. त्यावेळी त्याच्या अंगात देवी संचारते असे म्हणतात ध्वज लावण्याचे ठिकाण डोंगरावरील देवीच्या पूजेच्या स्थानापासून 600 फूट उंचीवर आहे. ध्वज लावण्यासाठी जो खांब असतो तो दर पाच वर्षांनी बदलला जातो. ध्वज लावण्याचे हे कार्य वाघाडी येथील मोरेश्वर सातवी कुटुंबीय परंपरेने करत आहेत. आदिवासी समाजाच्या चालीरीती आणि सांस्कृतिक जीवन या महालक्ष्मीच्या श्रद्धेनेच व्यापलेले आहे. या परिसरात शेतात, माळरानात जे पिकते ते या देवीला वाहिल्याशिवाय भक्षण केले जात नाही. 'पितृबारस', 'वाघबारस' आणि 'माहिबारस' हे आदिवासींचे लोकजीवन आणि कलाजीवन जपणारे विधिवत सोहळेच आहेत. निसर्गावर जगणारे, निसर्गाला जपणारे व निसर्ग पूजणारे आदिवासी त्या दिवशी भक्तिभावाने मंदिरात न चुकता जमतात.