पालघर -तालुक्यातील झांझरोळी येथील लघुपाटबंधारे विभागाच्या धरणाच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या मुख्य पाणी सोडण्याच्या भिंतीच्या बाजूस भगदाड पडले असून त्यामधून गळती सुरू झाली ( Leakage of Dam ) आहे. त्यामुळे धरणालगतच्या गावांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरले असून धरणालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला ( Alert For Villages Near the Dam ) आहे. त्याचप्रमाणे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
झांजरोळी येथील धरणाला भगदाड पडून पाणी गळती
पालघर तालुक्यातील माहीम–केळवा लघुपाटबंधारे योजनेवरील झांझरोळी येथील धरणाच्या बाहेरच्या बाजूला 175 ते 189 मीटर धरणामधून पावसाळ्यात काही प्रमाणात गळती होत होती. कालव्याच्या मुख्य विमोचनकाच्या भिंतीच्या शीर्षक बाजूस गळती सुरू ( Leakage of Dam ) झाल्याबाबत पाटबंधारे विभागाला कळवण्यात आले. धरण सुरक्षा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी 4 जानेवारीला माहीम-केळवा योजनेतील क्षेत्रीय पाहणी केली होती. यावेळी धरणाच्या विमोचक विहिरीस लागून असलेल्या नळाच्या मुखाजवळ पाणबुड्यांच्या साहयाने ताडपत्री लावून पाणी बंद करावे. तसेच ताडपत्री सुटू नये यासाठी वाळूच्या पिशव्या ठेवण्यात याव्यात. धरणाच्या मुख्य विमोचकाच्या उजव्या बाजूस होत असलेल्या गळतीचा विसर्ग नियमित नोंदविण्यात यावा. धरणाच्या दोन्ही बाजूस विमोचकाच्यावर असलेले गवत व झाडेझुडपे काढण्यात यावे धरणाचा पाणीसाठा हळूहळू कमी करण्याच्या पाटबंधारे विभागाला सूचना दिल्या.