पालघर-जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढत असून ही चिंताजनक गोष्ट आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. संभाव्य कोरोना रुग्णांनी लवकरात लवकर चाचणी करुन रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या व्यक्तींपैकी 60 टक्के व्यक्तींचा मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 72 तासांमध्ये झाला आहे.
कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी संभाव्य रुग्णांनी तातडीने चाचणी करावी- जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे - संभाव्य रुग्णांनी तातडीने चाचणी करण्याचे आवाहन
जिल्ह्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी संभाव्य कोरोना रुग्णांनी लवकरात लवकर चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूपैकी 60 टक्के रुग्णांचे मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यापासून 72 तासांमध्ये झाले आहेत.
संभाव्य कोरोना रुग्ण चाचणी करुन घेण्यास पुढे येत नाहीत, प्रकृती गंभीर झाल्यावर रुग्णालयात दाखल होतात यामुळे उपचार करण्यास पुरेसा कालावधी मिळत नसल्याने रुग्णाचा मृत्यू ओढवतो, असे शिंदे यांनी म्हटले आहे. 5 पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण ज्या गावात किंवा प्रभागात असतील तेथे तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. तसेच दररोज 500 आरटीपीसीआर आणि 200 पेक्षा जास्त अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहेत. ज्या रुग्णाला लक्षणे नाहीत परंतु तो कोरोनाबाधित आहे, अशा रुग्णाला संबंधित तालुक्यांमधील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील रिव्हेरा, टिमा, पोशेरी या कोविड रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन टॅन्क बसवण्यास परवानगी मिळाली असून ऑक्सिजनची सुविधा लवकर उपलब्ध होणार आहे. पुढील आठवड्यापासून डहाणू एमआरएचआरयू लॅब मध्ये 200 मोफत चाचण्या करता येणार आहेत. जास्तीत जास्त चाचण्या करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले आहे.