पालघर - तारापूर औद्योगिक वसाहतीमधील ए. एन.के. फार्मा(तारा नायट्रेट) या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. दरम्यान, या स्फोटात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना गुरुवारी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांचा मदत निधी देण्यात आला. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनातर्फे करण्यात येणार आहे. या घटनेप्रकरणी कंपनीच्या मालक वर्गाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने या दुर्घटनेमागील प्रमुख कारणाचा शोध घेणे शासकीय यंत्रणेला कठीण झाले आहे.
तारापूर येथील ए. एन. के फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत झालेल्या स्फोटाची चौकशी करण्यासाठी कोकण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक तसेच एमआयडीसीचे मुख्य अग्निशमन अधिकारी यांचा समावेश आहे. स्थानिक पातळीवरील शासकीय यंत्रणेचा प्राथमिक अहवाल आणि चौकशी झाल्यानंतर समितीमार्फत चौकशी सुरू होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
या औद्योगिक क्षेत्रात झालेल्या भीषण दुर्घटनेत ८ लोकांचा मृत्यू झाला होता. यापैकी मृत त्रिनाथ दसरी यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी मदत प्रलंबित असून, इतर 7 मृतांच्या नातेवाईकांना सहाय्यता निधीचे वाटप करण्यात आले. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनातर्फे करण्यात येणार आहे. स्फोटात मृत्यू झालेल्या ८ पैकी ७ जणांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाखांच्या धनादेशाचे वाटप पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार राजेश पाटील, श्रीनिवास वणगा आणि तहसीलदार सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हा धनादेश स्वीकारताना मृतांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.
दरम्यान, ११ जानेवारीला सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान रिअॅक्टरमध्ये स्फोट झाल्यामुळे ८ जणांचा मृत्यू झाला होता. सुमारे ५००० लिटर क्षमतेच्या रिअॅक्टरचे ४ तुकडे होऊन ते दुरवर विखुरले गेले होते. या अपघातात आरसीसी इमारतीचा भाग कोसळला तसेच लगतच्या गॅलेक्सी सरफॅटेंट व इतर उद्योगांचे नुकसान झाले.