पालघरच्या पश्चिम किनारपट्टीभागात 'नवरंग' पक्ष्याच्या आगमनाने भरले रंग - पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर इंडियन पिट्टा
इंडियन पिट्टा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या 'नवरंग' पक्षाचा मे ते ऑगस्ट हा विणीचा हंगाम असल्याने हे पक्षी दक्षिण भारत, श्रीलंका भागातून स्थलांतर करून जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात येतात व ऑगस्टनंतर ते पुन्हा दक्षिणेकडे जातात.
पालघरच्या पश्चिम किनारपट्टीभागात 'नवरंग' पक्ष्याच्या आगमनाने भरले रंग
पालघर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनुष्यांना स्थलांतराचे निर्बंध असले तरी, हे निर्बंध पशुपक्ष्यांना लागू होत नाही. याची प्रचिती सध्या पालघरमध्ये दिसून येत आहे. पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीतील वाढवण किनारपट्टी भागात 'नवरंग' म्हणजेच 'इंडियन पिट्टा' हा पक्षी दिसून आला आहे. या पक्ष्याचा वावर भारतासह श्रीलंका आणि पश्चिम आशियाई देशात दिसून येतो.
नवरंग हा भारतातील एक अतिशय सुंदर दिसणाऱ्या पक्ष्यांपैकी एक असून, या पक्ष्याची अन्य मराठी नावे बिहरा पाखरू, बिहरा, बंदी, खाटिक, गोळफा, पाऊसपेव, पाचापिल अशी सुद्धा आहेत. या पक्षाचे नर आणि मादी दिसायला सारखेच असून त्याचे निळा, हिरवा, काळा, पांढरा, तांबडा हे भडक रंग प्रामुख्याने असतात. हा पक्षी आकारमानाने मैनेएवढा असून भुंड्या शेपटीचा आहे. त्याचा पोटाखालचा व शेपटीखालचा रंग किरिमजी असतो. नवरंग पक्षी उडताना पंखांच्या टोकावर ठळक पांढरे ठिपके दिसतात. त्याच्या अंगावरील विविध नऊ रंगांच्या छटांमुळे त्याला 'नवरंग' हे नाव प्राप्त झाले आहे.इंडियन पिट्टा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या 'नवरंग' पक्षाचा मे ते ऑगस्ट हा विणीचा हंगाम असल्याने हे पक्षी दक्षिण भारत, श्रीलंका भागातून स्थलांतर करून जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात येतात व ऑगस्टनंतर ते पुन्हा दक्षिणेकडे जातात. झाडांचे मूळ, काड्या यापासून बनविलेल्या घरट्यात पक्ष्याची मादी चार ते सहा अंडी देते. विविध प्रकारचे कीटक हे नवरंगाचे खाद्य आहे. तो झुडपी जंगलात राहणे अधिक पसंत करतो, शिवाय बहुतेक वेळ जमिनीवरच घालवतो. पालघर जिल्ह्याची समुद्र किनारपट्टी समृद्धततेने नटलेली असून गेल्या अनेक वर्षांपासून वाढवण, डहाणू, चिंचणी, केळवे या किनारपट्टी भागात विविध देशी-परदेशी पक्षांचा वावर दिसून येत असून पक्षीमित्रांसाठी ही पर्वणीच ठरत आहे.Last Updated : Jun 24, 2020, 5:40 PM IST