पालघर - बहुजन विकास आघाडीचे पंकज देशमुख यांच्या नंतर माजी स्थायी समिती सभापती, नगरसेवक सुदेश चौधरी, किशोर नाना पाटील हे देखील शिवबंधनात अडकले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज या दोघांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.
हेही वाचा -पालघरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण; पेसा शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर बहुजन विकास आघाडीतील अनेक जण नाराज असल्याच्या चर्चा होत्या. बहुजन विकास आघाडीच्या इतिहासात प्रथमच पंकज देशमुख यांनी पक्षाविरोधात बिगुल फुंकून ही कोंडी फोडली होती. त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता. त्यानंतर बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती व आमदार हितेंद्र ठाकूर यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जाणारे सुदेश चौधरी यांनीही आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली होती.
आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात व्यक्त केली होती नाराजी
सुदेश चौधरी यांनी थेट आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र, कोणत्या पक्षात जायचे? हा त्यांचा निर्णय प्रलंबित होता. बहुजन विकास आघाडीतील त्यांचे वजन आणि राजकीय अनुभव लक्षात घेता भाजप किंवा शिवसेना पक्षात त्यांना आमंत्रित केले जाईल, अशी आशा राजकीय वर्तुळात होती, मात्र तब्बल सहा महिन्यांहून अधिक काळाच्या विचाराअंती त्यांनी आज शिवसेनेची कास धरली आहे. मागील काही दिवस सुदेश चौधरी यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाच्या बातम्या होत्या. या चर्चेला आज त्यांनी पूर्णविराम दिला आहे.
नालासोपारा वॉर्ड - ३८ चे नगरसेवक किशोर नाना पाटील यांचा शिवसेना पक्ष प्रवेश मात्र अनपेक्षित मानला जात आहे. या पक्षप्रवेशामागे तेही बहुजन विकास आघाडीत नाराज असल्याचे सांगितले जाते. अनेक पदांकरता लायक असतानाही पक्षात त्यांना डावलले गेल्यानेच त्यांनी हा मार्ग धरल्याचे म्हटले जाते. दरम्यान, या दोघांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना समर्थन असलेले अनेक माजी नगरसेवक व पदाधिकारी आगामी काळात शिवसेनेच्या वाटेवर चालण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -आर्यन खान प्रकरणातील NCB चा पंच किरण गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल