पालघर - विरार पूर्वेकडील मनवेल पाडा येथे व्ही.आर. एंटरप्राइजेस या ट्रॅव्हल्सकडून काही नागरिकांनी 3 महिन्यापूर्वी गणपतीला जाण्यासाठी कोकणचे बुकिंग केले होते. मात्र, शुक्रवारी दुपारी बस येणार आहे असे सांगून रात्र झाली तरी एकही गाडी न सोडल्याने प्रवाशी संतप्त झाले आहेत.
कोकणात जाणाऱ्या कोकणवासीय गणेश भक्तांची फसवणूक
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी वसई विरार शहर जिल्हा कार्यकारणी तर्फे नागरिकांना गणपतीला जाण्याकरिता नागरिकांना तिकीट बूक करुन दिले गेले. या वाहतुक संघटनेतर्फे देण्यात आलेल्या बुकिंग तिकीटांवर कोकण व्हिजन असे लिहिले आहे.
यामध्ये कुणी 2 महिन्यांपूर्वी तर कोणी 1 महिण्याआधी तिकिटे बुक केली. मात्र, त्यानंतर प्रवाशांना या रिझर्वेशनबाबत कसलीही माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर नुकतेच 4दिवसांआधी रिझर्वेशनची माहिती देवून काल शुक्रवारी दुपारी गाडी संबंधितस्थळी येणार असल्याचे सांगितले.
यानंतर, प्रवासी दुपारपासून सदर बसची वाट पाहत असून अद्याप कुठलीही बस प्रवाशांपर्यंत आलेली नाही. तर, तिकीटांवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क केला असता त्यातील एकही नंबर लागत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे प्रवाशांचा लक्षात आले.
या प्रकारात ऐनवेळी फसवणूक झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे असून शेकडो प्रवासी यात अडकले असून बुकिंग ऑफिसमधील माणसेही निघून गेल्याने प्रवाशी हतबल झाले आहेत.