पालघर - कोकणात नव्या चक्रीवादळाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह उत्तर कोकणातील पालघर जिल्हातही ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या अगोदर १ डिसेंबरला पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगडसह काही भागात रात्री 8 च्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर, आज (गुरुवार) सायंकाळी 4 च्या सुमारास वाडा तालुक्यासह इतर तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या परिस्थितीत रब्बी हंगाम घ्यायचा की नाही, या चिंतेत सध्या शेतकरी सापडला आहे.
रब्बी हंगामातील बियाणे पेरले गेले आहे, त्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट पिकावर आहे. ही पेरलेली बियाणं अती पावसाने वाया जाण्याच्या शक्यतेने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. राज्यातील कोकण किनारपट्टीवर या अगोदर 'क्यार' महाचक्रीवादळाचा तडाखा बसला होता. असे असताना आता नवे वादळ तयार होत असल्याची माहिती आहे. या निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाने पालघर जिल्ह्यात धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
गुरुवार सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि हवेत गारवा निर्माण झाला होता. अवकाळी पावसाने खरीप हंगामातील शेतकरी वर्गाचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. असे असताना या चक्रीवादळाच्या पावसाने रब्बी हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला आणि कडधान्य पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकरीवर्ग व्यक्त करत आहेत.