पालघर- जिल्ह्यातील गडचिंचले येथे जमावाने केलेल्या हल्ल्यात दोन साधू आणि एक ड्रायव्हर अशा तिघांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला, त्यानुसार सीआयडीने बुधवारी डहाणू न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून, ही घटना फक्त अफवेतून घडली असल्याचे सीआयडीने आरोपपत्रा म्हटले आहे. या घटनेनंतर अनेक राजकीय पक्षांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. पण, सीआयडीच्या तपासातून ही घटना केवळ अफवा पसरवल्यामुळे घडली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीआयडीने याप्रकरणी 808 लोकांची सखोल चौकशी करून 154 जणांना अटक केली आहे. तसेच पुढील कारवाई न्यायालयात चालेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
गडचिंचले येथे गावात चोर आल्याचा संशय घेत जमावाने 16 एप्रिल रोजी दोन साधू व वाहनचालकाची निर्घृण हत्या केली. या हत्येने सर्वत्र खळबळ उडाली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गृह विभागाने हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले. या प्रकरणी 165 जणांना अटक करण्यात आली असून, यातील 11 अल्पवयीन आहेत. ही घटना 16 एप्रिल रोजी रात्री घडली. तर या प्रकरणी 17 एप्रिल रोजी गुन्ह्याची नोंद झाली होती. 90 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करणे क्रमप्राप्त असल्याने मुदतीत सीआयडीमार्फत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
गडचिंचले हत्याकांड प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सीआयडीने याप्रकरणी आतापर्यंत 808 संशयीतांची चौकशी केली असून, 108 जणांच्या साक्षी नोंदविल्या आहेत. पहिल्या गुन्ह्याचा (क्र. 76) तपास सीआयडीचे डीवायएसपी विजय पवार यांनी केला असून, 126 आरोपींच्या विरोधात 4 हजार 955 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. तर दुसऱ्या गुन्ह्याचा (क्र. 77) तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे डीवायएसपी इरफान शेख यांनी केला असून, त्यांनीही 126 आरोपींविरोधात 5 हजार 921 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. कासा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या दोन गुन्ह्यात (गुन्हा दाखल क्र. 76/2020 व 77/2020) आरोपपत्रामध्ये समान कलमे समाविष्ट केली आहेत.