पालघर - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी २०१८ च्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील हेमंता केशव पाटील हा ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा देशात ३९ वा तर राज्यात पाचवा आला आहे.
हेमंता हा वाडा तालुक्यातील शिल्लोत्तर या गावातील विद्यार्थी असून त्याने आपले प्राथमिक शिक्षण तलासरीमधील ठक्कर बाप्पा आश्रमशाळेत पूर्ण केले. पहिलीपासूनच तो कायम अव्वल क्रमांकावर असायचा. हेमंताला शिक्षण, वक्तृत्व आणि खेळाचीही आवड आहे. हेमंताने बारावीपर्यंतचे शिक्षण वाडा तालुक्यातील चंदावरकर महाविद्यालयामध्ये पूर्ण केले असून विशेष म्हणजे तेव्हाही तो तालुक्यात पहिला आला होता. त्यानंतर हेमंताने रायगड जिल्ह्यातील लोणेरमध्ये केमिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. तेथेही तो गोल्ड मेडलिस्ट ठरला.