पालघर - जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सखल भागात ठीक-ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघर, बोईसर, डहाणू या परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामध्ये अनेक सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.
'कित्येक घरातील लाईटही नाही'
नागरिकांना कामावर जायला, दैनंदिन वस्तु घ्यायला, बाजारात जायला अशा सर्व गोष्टींसाठी बाहेर पडावे लागत आहे. मात्र, परिसरात सुमारे कंबेराला लागेल इतके पाणी साचल्याने अनेक अडचणी निर्मा झाल्या आहेत. त्यामध्ये कित्येक घरातील लाईटही गेली आहे. अशा असंख्य अडचणींमुळे येथील नागरिक परेशान आहेत. स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून आमचे जनजीवन सुरळीत करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
'बोईसराला तलावाचे स्वरूप'
बोईसर-मानसह डहाणूतही अनेक सखल भागात पाणी साचल आहे. जवळपास 3 हजार लोकवस्ती असलेल्या बोईसर ईस्ट मधील टाटा हौसिंग सोयासायटी परिसराला दरवर्षी प्रमाणे यंदाही ही तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तळमजल्यापर्यंत पाणी साचल्याने, नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. तर, रस्त्यावर पाणी साचल्याने अनेकांना कामावर येण्या-जण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. सकाळी समुद्राला भरतीची वेळ असल्याने, पाण्याचा जलद निचरा होण्यास अडचण निर्माण झाली आहे. आमच्याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी विनंती येथील नागरिक करत आहेत.