पालघर - जिल्ह्यात पावसाचा जोर रविवारीही कायम असून नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. पालघर जिल्ह्यातील वैतरणा, सूर्या आणि पिंजाळ या नद्यांना पूर आला आहे. तर वैतरणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान
पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर सुरुच आहे. यामुळे जिल्ह्यातील नद्या-नाल्यांना पूर आला आहे. सुर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडले असून सूर्या नदीत 36000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सूर्या आणि वैतरणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोलमडून पडली आहे. तसेच अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
जिल्ह्यातील वैतरणा नदीने रौद्र रूप धारण केले असून मनोर गावला पाण्याने चारही बाजूंनी वेढले आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आणि पालघर शहर यांच्यामध्ये मनोर येत असल्याने या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अजूनही पावसाचा जोर कायम असून वैतरणा नदीचे पाणी मनोर गावाच्या दिशेने वाढू लागले आहे. सर्वच नद्यांना पूर आला असून जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.