पालघर- वसई-विरार, नालासोपाऱ्यामध्ये पावसाने जोर धरला आहे. शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून पावसामुळे वसई-विरारमधील सर्व रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे.
वसई-विरार, नालासोपाऱ्यामधील रस्त्यांना नदीचे स्वरूप - नालासोपाऱ्यात पाऊस
काल रात्रीपासून पालघर जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून वसई-विरार व पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोठणपूर येथील नगरपरिषद आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांच्या चाळीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसानही झाले आहे. मुसळधार पावसामुळे पालघर-बोईसर रोड, पालघर- माहीम रोड, पालघर- मनोर रोड, पालघर- टेंभोडे रोड, पालघर- माहीम रोड या रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
विरारच्या सखल भागात असलेल्या विवा कॉलेज, बोलिज रोड तर नालासोपाऱयात टाकीरोड, तुळींज रोड, सेन्ट्रल पार्क, गाला नगर, वसंत नगरी, नालासोपारा स्टेशन परिसर, अचोळे रोड येथेही पाणी साचले आहे. हा पाऊस असाच सुरू राहिला तर पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.