पालघर - रोजगारासाठी सततची भटकंती. जीवनात स्थैर्य नाही. नावावर जमीनजुमला तर नाहीच. शिवाय, जन्म नोंदणीचा दाखलाही नाही. ही परिस्थिती आहे मोखाडा तालुक्यातील डोलारा गावातील भाग्या जत्र्या कवर या ८५ वर्षीय कातकरी समाजातील आदिवासी वृद्धाची. स्वत:ची, पूर्वजांची लेखी नोंद नसणारे कवर आणि त्यांच्यासारखे कित्येक कुटुंब सीएए आणि एनआरसी कायद्याच्या कसोटीत नापास तर होणार नाहीत ना, ही भीती आहे. देशभरात सीएए आणि एनआरसीवरून वातावरण तापले आहे. यावरून राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. मात्र, याची पुसटशी कल्पनाही भाग्या आणि मंजुळा कवर या वृद्ध दाम्पत्याला नाही. या एकूणच परिस्थितीचा आढावा 'ईटीव्ही भारत'ने घेतला आहे.
कवर कुटुंब तीन पिढ्यांपासून डोलारा गावात वास्तव्याला आहे. पण या वास्तव्याचा ते कागदोपत्री पुरावा देऊ शकत नाहीत. फार फार तर ते आपल्या पूर्वजांची नावे सांगू शकतात. मंजुळाबाई तर निरक्षर. वय सुद्धा माहीत नसलेली ही वृद्धा जन्माची नोंद कशी काय सांगू शकणार? कवर यांच्यासारखी अनेक कुटुंब पालघर जिल्ह्यात सरकारलेखी अज्ञात म्हणून जगत आहे. सीएए आणि एनआरसीची अंमलबजावणी झाल्यास अशा कुटुंबाचे काय होणार, याचे उत्तर सरकारला द्यावे लागणार आहे.