पालघर - जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोर गरीब आदिवासांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त भागाची पाहणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले यांनी केली.
पालघर जिल्ह्याला राज्य सरकारने तात्काळ ५० कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी आमदार विनोद निकोले यांनी केली आहे.
जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी भागात पावसामुळे आदिवासींचे अतोनात नुकसान झाले आहे. आमदारांनी सायवन, निंबापूर, बापूगाव, गंगोडी या गावांना भेट दिली. या ठिकाणी अनेक घरांची छप्परे उडून गेली आहेत, काहींचे पत्रे उडून गेले आहे तर काहीजण पूर्णतः बेघर झाले आहेत.
तसेच लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झालेले आदिवासी बांधव शेती करून कसेबसे आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत होते. पण, त्यातही पावसामुळे त्यांचे अधिकच नुकसान झाले आहे.
पालघर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे, तर अनेक भागात अतिवृष्टी देखील झाली आहे. यामुळे आदिवासी, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढलेल्या पिकांना नवीन पालवी फुटत कोंबदेखील आले आहेत.
मध्यंतरी रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळात जितके नुकसान झाले होते. त्याच बरोबरीचे पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरीचे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्याला राज्य सरकारने तत्काळ ५० कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले यांनी केली आहे.