महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 5, 2020, 9:32 PM IST

ETV Bharat / state

"बुडत्याला काडीचा आधार", ही म्हण खरी ठरवणारी पालघरच्या पुरातील थरारक घटना..!

ममता नावाची चिमुकली रात्री दोनच्या सुमारास पुराच्या पाण्यात वाहून गेली. मात्र, पाण्यात वाहत असताना रात्रीच्या अंधारात एका झाडाच्या फांदीचा आधार घेत तिने चार तास परिस्थितीशी झुंज दिली.

बचावलेली मुलगी
बचावलेली मुलगी

पालघर - "बुडत्याला काडीचा आधार" अशी मराठीत म्हण असून, ही म्हण पालघरमध्ये सत्यात उतरली आहे. पालघर जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपले असून नदी-नाल्यांना पूर आला आहे. ममता विजय लिलका ही 5 वर्षाची चिमुकली रात्री दोनच्या सुमारास पुराच्या पाण्यात वाहून गेली. मात्र, पाण्यात वाहत असताना रात्रीच्या अंधारात एका झाडाच्या फांदीचा आधार घेत तिने चार तास परिस्थितीशी झुंज दिली.

सकाळी तिला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले असून चिमुकलीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ममता ही 5 वर्षांची चिमुकली डहाणू तालुक्यातील शेणसरी येथील रहिवासी आहे. आई-वडील व तीन भावंडेे शिवारातील झोपडीत राहतात. मंगळवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास हे कुटुंब राहत असलेल्या घरालगतच्या दोन्ही ओढ्यांची पाणी पातळी वाढली. पाणी घरात शिरू लागल्याने वडील विजय लिलका आपली पत्नी, चिमुकली ममता व अन्य मुलांना घेऊन बाहेर पडले. रात्रीच्या अंधारात पुराच्या पाण्यातून चालताना 5 वर्षीय ममताचा तोल गेल्याने तिचा हात सुटून ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.

त्यानंतर विजय यांनी नातेवाईकांसह भावाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर कासा पोलिसांना कळवून ग्रामस्थांसह अंधारात त्यांनी मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यांना अपयश आले.

बापूगाव येथीलच एक शेतकरी पुराच्या पाण्यामुळे आपल्या शिवारात अडकले होते. पूर ओसरताच सकाळी सहाच्या सुमारास घरी परतत असताना, एका झाडाच्या फांदीचा आधार घेत आपला जीव वाचवण्यासाठी रडणाऱ्या चिमुकली ममताकडे त्यांचे लक्ष गेले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून तिला बाहेर काढून लिलका कुटुंबीयांकडे सुपुर्द केले. त्यानंतर या चिमुकलीला उपचारार्थ सायवन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग यांनी आरोग्य केंद्र गाठून ममता व तिच्या कुटुंबाची भेट घेतली आणि तिच्या धाडसाचे कौतुक करत तिची पाठ थोपटली.

ABOUT THE AUTHOR

...view details