पालघर- शहरातील माहीम रस्त्यावरील जयेश अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर शुक्रवारी रात्री अचानक आग लागली. आगीमुळे सिलिंडरचे २ स्फोटही झाले. आगीच्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आग लागलेल्या सदनिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पालघरमध्ये अपार्टमेंटमधील सदनिकेला आग; सिलिंडरच्या स्फोटाने मालमत्तेचे नुकसान - POLICE
पालघरमधील अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीत २ सिलिंडरचे स्फोट.... आगीच्या घटनेत जीवितहानी नाही मात्र, मालमत्तेचे नुकसान.. जयेश अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेस लागली होती आग
जयेश अपार्टमेंट या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील बी- विंग 203 या सदनिकेत शुक्रवारी रात्री अचानक आग लागून सिलिंडरचे २ स्फोट झाले. माणिक पंत यांची ही सदनिका असून, अमित शर्मा यांना ही सदनिका त्यांनी भाडेतत्त्वावर दिली होती. आग लागल्याक्षणी शर्मा यांच्या पत्नी उर्वशी व मुलगा रुद्र हे सदनिकेतच होते. हे दोघेही लगेचच इमारती बाहेर पडले. आगीच्या विळख्यात सदनिकेतील २ सिलिंडर आल्याने एका मागोमाग एक सिलिंडरचे २ स्फोट झाले. सिलिंडरचे हे २ स्फोट इतके मोठे होते की, इमारतीतील इतर सदनिकांच्या काचा फुटल्या. या काचा रहिवाशांच्या अंगावर उडल्यामुळे, काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सदनिकेचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.