वसई (पालघर)- शहरात अनाथ असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी तीघांना अटक केली आहे. अजय कुमार विनोद जयस्वाल (34), मुन्ना यादव (28) आणि अक्रम चौधरी (34) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या वर्षी नोव्हेंबर 2020 ते ऑगस्ट दरम्यान सामूहिक बलात्काराशिवाय आरोपींनी तिच्यावर अनेक वेळा स्वतंत्रपणे लैंगिक अत्याचार केले होते, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.
मुलीची आई कुटुंब सोडून गेली होती, त्यानंतर अल्पवयीन तिच्या वडिलांसोबत भाड्याच्या घरात राहू लागली. मात्र, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर, घरमालकाने मुलीला ती जागा सोडण्यास सांगितले, यामुळे ती वसईतील एका फूटपाथवर राहू लागली, असे पोलीस उपायुक्त (रेल्वे) प्रदीप जाधव यांनी सांगितले आहे. 3 ऑगस्ट रोजी, पोलिसांच्या चमूला मुलगी वसई रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असल्याचे आढळले. ती अघातग्रस्त असल्याचे दिसत असल्याने ती कोणतीही माहिती सांगू शकली नाही. त्यानंतर पोलिसांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला. या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठीही पाठवण्यात आले होते, ज्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.