महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरचे माजी आमदार नवनीतभाई शाह यांचे निधन - Navneetbhai Shah dies in palghar

नवनीतभाई शाह हे १९५७ च्या द्वैभाषिक विधानसभेचे आणि १ मे १९६०ला स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या विधानसभेचे आमदार होते.

नवनीतभाई शाह

By

Published : Aug 27, 2019, 9:55 AM IST

पालघर -ज्येष्ठ समाजवादी नेते व पालघरचे माजी आमदार नवनीतभाई शाह यांचे वयाच्या ९५व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. मुंबईच्या कोकिळाबेन रुग्णालयात काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने पालघर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

शाह हे १९५७ च्या द्वैभाषिक विधानसभेचे आणि १ मे १९६०ला स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या विधानसभेचे आमदार होते. विधानसभेवर निवडून गेलेले ते एकमेव मराठी उमेदवार होते, जनतेशी नाळ जोडलेले व सर्वसामान्यांचा विश्वास सामाजिक कार्यातून संपादन केलेले नवनीत भाई यांना जनतेने विश्वास ठेवून निवडून दिले होते. महाराष्ट्राच्या विधानसभेवर ते २ वेळा निवडून गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई नातवंडे असा परिवार आहे.

नवनीतराय भोगीलाल शाह उर्फ नवनीतभाई यांचा जन्म ८ डिसेंबर १९२३ला वलसाड, गुजरात येथे झाला. वलसाडला जन्मलेले नवनीतभाई हे भोगीलाल शाह यांचे एकुलते एक पुत्र होते. ते ५ वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांची सावत्र आई लीलाबेन यांनी नवनीतभाई यांचा सांभाळ केला.

शाह कुटुंबाने आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मुंबई येथे नवी पेढी काढली. कमिशन एजंट आणि हुंडीचा व्यवहार करणारी पेढी असे या शाखेचे स्वरुप होते. या शाखेचा व्यवहार नवनीतभाई यांचे काका नागरदास पाहू लागले. त्यानंतर वलसाड-मुंबई या मधील सोयीचे ठिकाण म्हणून पालघरची निवड करुन नवनीतभाई यांचे वडील भोगीलाल शाह १९२९-३० साली पालघरला आले. नवनीतभाई १९४१ साली मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर १९४२ साली इंटर कॉमर्सला असताना सिडन्हॅम कॉलेज ऑफ कॉमर्स सोडून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. १९४४ साली ते सिडन्हॅम कॉलेज ऑफ कॉमर्स येथून ते इंटर कॉमर्स व १९४८ साली बी.कॉम. उत्तीर्ण झाले.

स्वतंत्र्य आंदोलन आणि नवनीतभाई -

अखिल भारतीय काँग्रेसचे महाअधिवेशन मुंबईत गोवालिया टँक मैदानावर भरले होते. नवनीतभाई यांनी ८ ऑगस्टला अधिवेशनाच्या मुख्य मंडपात व्यासपीठाजवळ राहून सर्व थोर नेत्यांची स्फुर्तीदायक भाषणे जवळून ऐकली. यावेळी त्यांनी ‘चले जाव’ म्हणून इशारा देणारे महात्मा गांधी यांचे संस्मरणीय भाषण देखील ऐकले. दुसऱ्या दिवशी ९ ऑगस्ट १९४२ला ते आपले मित्र बच्चूभाई गांधी यांच्यासह गोवालिया टँक मैदानावर उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी मैदान खाली करण्याचा इशारा दिला आणि अश्रुधूर सोडला. लोकांची पांगापांग झाली आणि इतक्यात अरुणा असरफ अली यांनी ध्वजारोहण केले. अश्रुधुरापासून रक्षण करण्यासाठी नवनीतभाई मैदानावर आडवे पडले. पोलिसांनी त्यांना उचलून मैदानाबाहेर टाकले आणि त्यांनी झडप घेऊन पुन्हा मैदानात आडवे झाले. पोलिसांनी त्यांना पुन्हा बाहेर काढले. हा प्रकार ३-४ वेळा झाला. या घटनेमुळे शिक्षण सोडून क्रांतीकार्याला वाहून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत अनेक भूमिगत कारवायांमध्ये नवनीतभाईंनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कार्य केले. या दरम्यान त्यांचे अनेक क्रांतिकारी नेत्यांशी संबंध आला. एस.एम. जोशी यापैकी एक होते. १९४४ साली गोदीमध्ये स्फोट झाला, या कार्यात त्यांचा सहभाग होता. १९४३ ते १९४९ साली मुंबई येथे राष्ट्रसेवा दलाचे कार्य नवनीतभाई करत होते. सेवा दलाचे शाखा प्रमुख, भुलेश्वर-जिल्हा प्रमुख, पूर्ण वेळ कार्यकर्ता आणि मुंबई प्रांत कार्यालयाचे चिटणीसपद त्यांनी सांभाळले. संघटना बांधणीसाठी त्यांनी योगदान दिले. ‘साथी’ या समाजवादी युवकांच्या नियतकालिकेत काही काळ लिखाण केले. या नियतकालिकेचे मुख्य लेखक, संपादक ही पदे त्यांनी सांभाळली.

राजकीय वाटचाल -

१९५२ साली पालघरचे प्रथम सरपंच -

स्वातंत्रोत्तर काळात पहिल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणांना संधी देण्याचे एकमत झाले. मात्र, बिनविरोध निवड झालेले आणि निवडून आलेले काँग्रेस आणि समाजवादी पक्षांचे उमेदवार यांची संख्या समान झाली. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा आदेश डावलून काँग्रेस सभासदांनी सद्विवेक बुद्धीला स्मरुन नवनीतभाईंना सरपंच म्हणून एकमताने निवडून दिले.

संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर पालघर येथे तात्यासाहेब चुरी यांच्या अध्यक्षतेखाली मोठी परिषद झाली. आचार्य अत्रे या परिषदेचे प्रमुख वक्ते होते. महाराष्ट्रावरील अन्यायाचा निषेध म्हणून नवनीतभाईंनी सरपंचपदाचा राजीनामा दिला. पुढे १९५७ साली झालेल्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समिती या सर्व पक्षीय संघटनेचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली. भाषिक अभिमानावर उभ्या राहिलेल्या त्या चळवळीत ऐन उत्कर्ष काळात, नवनीतभाईंसारख्या एका गुजराती भाषिक उमेदवाराला मराठी जनतेने घसघशीत बहुमताने निवडून दिले. संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे निवडून आलेले ते एकमेव बिगरमराठी आमदार होते. १९५७ च्या द्वैभाषिक विधानसभेचे आणि १ मे १९६० रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या विधानसभेचे आमदार असण्याचा त्यांना बहुमान प्राप्त झाला.

१९६२ साली पालघर पंचायत समितीचे पहिले सभापती -

नवनीतभाईंचा १९६२ साली झालेल्या निवडणुकीत पराजय झाला. पराजयामुळे खचून न जाता कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी १९६२ साली पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. १ मे १९६२ ला पंचायत समितीची स्थापना झाली आणि नंतर निवडणुका झाल्या. पालघर तालुक्यातील पंचायत समितीमध्ये समाजवादी पक्षाची सरशी होती. नवनीतभाई पालघर पंचायत समितीचे पहिले सभापती झाले. पंचायत समिती सभापती पदाच्या वर्षभराच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक आव्हानात्मक कामे आणि रस्ते निर्मितीची कामे केली

१९६७ साली पुन्हा पालघरचे आमदार -

नवनीतभाई १९६७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. या आमदारकीच्या कारकिर्दीत पालघर भागाकरता भरीव काम त्यांच्या हातून झाले.

विधानसभेतील नवनीतभाईंचे कार्य -

संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे निवडून आलेल्या आमदारकीच्या कारकिर्दीत अनेक ज्येष्ठ नेत्यांचा सहवास नवनीतभाईंना लाभला. सर्व प्रथम राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत नवनीतभाई ५ मिनिटे बोलले आणि तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांसह इतर नेत्यांचे त्यांच्याकडे लक्ष वेधून घेतले. शासनाच्या शाळेतील शिक्षकांना मिळत असलेल्या ४० रुपये वेतनाकडे विधानसभेचे लक्ष वेधले आणि तो प्रश्न मार्गी लावला. मच्छिमारांचे प्रश्न, समुद्राचे अतिक्रमण व धूप, जंगलातील शेताखालील जमिनी, प्राथमिक शिक्षक, शेतीला जोडधंदा म्हणून दूध धंदा, पॅडी पायलट योजना, मुंबईतील शेणखत, सहकारी भात गिरणी, कमी झालेले भाताचे भाव, समुद्राच्या मोठ्या उधाणामुळे होणारे नुकसान, विद्युत पुरवठाबद्दल विधानसभेत नवनीतभाईंनी प्रश्न विचारुन पाठपुरावा केला. कुळ कायद्यासंबंधी अनेक प्रश्न निर्माण होत असताना विधानसभेत कायद्यासंदर्भात अनेक प्रश्न विचारुन कायद्याची अंमलबजावणी सोयीस्कर होईल या दृष्टीने प्रयत्न केले. १९६७ ला आमदार म्हणून पुन्हा निवडून गेल्यावर सरकाराला विचारल्याशिवाय कोणत्याही आदिवासींच्या जमिनीचा ताबा इतरांना देऊ नये, असा आदेश मंत्र्यांना काढावयास त्यांनी भाग पाडले.

ग्रामीण भागाशी संबंधित कायद्याची निर्मिती होताना नवनीतभाईंनी चर्चेत भाग घेऊन वेळोवेळी सूचना केल्या. ग्रामपंचायत कायदा १९५८, सहकार कायदा १९५९, जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा १९६१ हे महत्त्वाचे कायदे करण्यात त्यांचा सहभाग होता. कोकण कृषी विद्यापीठाचा कायदा करीत असताना मत्स्योत्पादन हा शेतीचाच एक भाग असून या कायद्यात दुरुस्ती करून मत्स्योत्पादनाचा त्या कायद्यात समावेश केला. कोकणात बंधारे यशस्वी होत नाहीत, असे तज्ज्ञांच्या मताला चुकीचे ठरवत आदिवासी भागात सूर्या प्रकल्पासारखा मोठा जलसिंचन प्रकल्प विधानसभेत सातत्याने पाठपुरावा करुन मंजूर करून घेतला.

मच्छिमारीकरता लागणार्‍या डिझेलवर विक्रीकर माफ करून घेण्याकरता विनंती समितीकडे प्रश्न वर्ग करुन घेऊन तांत्रिक अडचणी सोडवत शासनाला तसा निर्णय घेण्यास भाग पाडले.

विधान सभेतील इतिवृत्ताला प्रसिद्धी देण्याविषयी नवनीतभाईंनी बिनसरकारी विधेयक मांडले आणि ते संमत करुन घेतले. ‘महाराष्ट्र विधिमंडळ इतिवृत्त प्रसिद्धीस संरक्षण देणारे विधेयक’ म्हणून ते ओळखले जाते.

राजकीय नेते म्हणून अल्पावधीत नवनीतभाई पुढे आले, पण राजकीय महत्त्वकांक्षेने स्वतःला राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळावे म्हणून त्यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत. १९७७ ते १९७९ पालघर तालुका जनता पक्षाचे नवनीतभाई अध्यक्ष होते, त्यानंतर जनता दलाचे सहप्रवासी होते.

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य -

सफाळे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेचे नवनीतभाईंनी सुमारे १० वर्षे अध्यक्षपद भूषवले. नवनीतभाई १९६८ पासून आतापर्यंत सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे सदस्य होते. त्यांनी महाविद्यालयाच्या जागा संपादन करण्याच्या प्रक्रियेपासून निधी संकलन, इमारत बांधणी, महाविद्यालयाचा विस्तार या बाबींकडे स्वतः लक्ष देऊन मोलाचे योगदान दिले. पालघर महाविद्यालयात ग्रामीण विकास हा अभ्यासक्रम सुरू व्हावा, यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. आज मुंबई विद्यापीठात फक्त पालघर महाविद्यालयात ‘ग्रामीण विकास’ हा अभ्यासक्रम आहे.

रेल्वे प्रश्नांवर आंदोलने -

पालघर व परिसरातून मुंबईला जाण्याकरता सोईस्कर रेल्वे प्रवास आहे. मर्यादित गाड्या असल्यामुळे प्रवाशांना होणार्‍या त्रासाला वाचा फोडण्याकरता नवनीतभाईंच्या पुढाकाराने पश्चिम रेल्वे प्रवासी संघटनेची उभारणी केली. या संघटनेमार्फत प्रवाशांच्या सभा घेणे, रेल्वे प्रशासनाच्या अन्यायाविरुद्ध निदर्शने करणे, सत्याग्रह करणे, आंदोलने करणे नित्याचे होते. प्रवाशांचे हित जपण्यासाठी रेल्वे अधिकार्‍यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करणे, हे महत्त्वाचे काम ते करत होते.

नव्याने सुरू झालेल्या गाड्यांना पालघरला थांबा नसायचा. या गाड्यांना थांबा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असे. पहाटे मुंबईकडे जाणारी सौराष्ट्र मेलला पालघरला थांबा मिळावा, यासाठी नवनीतभाईंनी स्वतः महिनाभर रेल्वे स्टेशनवर पहाटे जाऊन थांब्याकरता किमान आवश्यक तिकीटे स्वतःच्या पैशाने खरेदी करून घेतली. यामुळे नंतर सौराष्ट्र मेलला पालघरला थांबा मिळाला.

वलसाड एक्सप्रेसला दैनंदिन होणार्‍या विलंबाचा निषेध करण्यासाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलने केली. अनेक आंदोलनाच्या वेळी त्यांच्यावर खटले भरले गेले होते. पालघर-डहाणू भागात शहरीकरण झाल्यानंतर या भागातून शटलची मागणी होऊ लागली. १९७७ ला केंद्रात जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर मधू दंडवते रेल्वेमंत्री असताना डहाणूपर्यंत शटल सुरू करण्यात आली. लोकांना सोयीस्कर असे वेळापत्रक तयार करुन घेतले. नंतर डीएमयू गाड्यांच्या मागण्यांकरता पाठपुरावा केला.

विरार ते डहाणू भागाला मुंबई उपनगरीय सेवेत सामावून घेण्याची मागणी नवनीतभाईंनी प्रथम केली. एस.सी-डी.सीचा प्रश्न निकाली काढावा. लगेज वाहतूकदारांचा प्रश्न, फलाटावर प्रवाशांना सुख सोयी या सारख्या अनेक समस्या सुटण्याकरिता पाठपुरावा केला.

पालघर मित्रची सुरुवात -

लोकशाही प्रक्रियेत प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असते. देशातील महत्त्वाच्या घडामोडी आणि समाजजीवनाच्या विविध क्षेत्रातील बदलांचे प्रतिबिंब वृत्तपत्रांच्या आरशात पाहायला मिळते. त्यामुळे त्यांनी बेलगाम राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्यासाठी, सरकारला समाजोपयोगी निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी, स्थानिक प्रश्नांना वाचा फोडून राजकारणाला दिशा देण्यासाठी ‘राज्य शक्ती नव्हे, लोकशक्ती महान’ हे ब्रीद वाक्य असणारे पालघर मित्र या पाक्षिकाची ७ मे १९७४ मध्ये सुरुवात केली. आणीबाणीच्या काळात सरकारच्या निर्बंधामुळे पालघर मित्र बंद होता. २२ सप्टेंबर १९८२ मध्ये या पाक्षिकाची पुन्हा सुरुवात करण्यात आली. २ ऑक्टोबर १९९२ मध्ये पालघर मित्र साप्ताहिक स्वरूपात सुरू झाला असून १२ ऑक्टोबर २००५ पर्यंत नवनीतभाई या अंकाचे संपादक होते.

१९८२ मध्ये ‘निरिड’ची स्थापना - (NIRID: National Institute of Rural Integrated Development)

सामाजिक वनीकरण, जलसंवर्धन व परसबाग या योजना राबवण्याच्या उद्देशाने १९८२ साली ‘निरिड’ संस्थेची स्थापना झाली. आधुनिक शेती, फलोद्यान, पर्यावरण संरक्षण इत्यादी उपक्रमाद्वारे आदिवासी बांधवांचे अनौपचारिक शिक्षणाचे काम ‘निरिड’ करीत आहे. नवनीतभाई या संस्थेचे सुरुवातीपासून विश्वस्त आहेत. या संस्थेमार्फत अनेक यशस्वी उपक्रम राबवले गेले आहेत.

‘ताडी’ला करमुक्त केले -

पालघर भागात गरीब जनता श्रमपरिहार करण्यासाठी ताडीचे सेवन करते. १९६७ साली ‘दारुबंदी धोरणांतर्गत’ ताडी कर आकारणी करुन त्याच्या विक्रीवर निर्बंध लावले होते. नवनीतभाईंनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे जाऊन ताडीवरील कर आणि विक्रीवर लावलेले निर्बंध काढून टाकले.

डॉ. पी.व्ही. मंडलिक ट्रस्टचे ज्येष्ठ कार्यकर्ते -

पंचायत राज व्यवस्था आणि व्यवस्थेच्या विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण लिखाण नवनीतभाईंनी केले आहे. ‘पंचायत राज’ या मासिकात नियमित लिखाण, ७३ व्या घटना दुरुस्तीविषयी विस्तृत लेखन त्यांनी अनेक वृत्तपत्रातून केले आहे. डॉ. पी.व्ही. मंडलिक ट्रस्टमार्फत चालणार्‍या ‘पंचायत राज’ लोकशिक्षण कार्यात नवनीतभाई प्रत्यक्षपणे सहभागी झाले होते. ग्रामीण भागातील पंचायत सदस्यांसाठी पुस्तिका लिहिणे, प्रशिक्षण शिबिरे व चर्चा सत्र भरवणे यासारखे उपक्रम राबवून ग्रामीण कार्यकर्त्यांमधून उद्याचे शासनकर्ते तयार करण्याचे प्रदीर्घ कार्य नवनीतभाईंनी केले. तसेच ‘मी-एस.एम’ या एस.एम.जोशींच्या आत्मचरित्रपर ग्रंथाचा गुजराती भाषेत अनुवाद केला. आपलं गाव आपली पंचायत, ग्रामसभा, आपला सरपंच, महाराष्ट्र वित्त आयोग प्रतारणा व अवमूल्यन, ग्रामपंचायत अधिनियम प्रकरण तीन अ, आदिवासी स्वशासन कायदा ही पुस्तके त्यांनी लिहली.

ABOUT THE AUTHOR

...view details