पालघर - 30व्या वसई तालुका कला-क्रिडा महोत्सवाला गुरुवारी(26 डिसेंबर) सुरुवात झाली. माजी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. 31 डिसेंबर पर्यंत हा महोत्सव वसईतील चिमाजी आप्पा मैदानावर संपन्न होणार आहे. या स्पर्धेदरम्यान, 68 कला व क्रीडा प्रकारात एकूण 6 हजार बक्षिसांचे वाटप केले जणार आहे.
वसई तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि अंगभूत क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी, या हेतूने गेल्या 30 वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंग स्टार्स ट्रस्ट विरार आणि वसई तालुका कला-क्रीडा विकास यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी याचे आयोजन करण्यात येते. या क्रीडा महोत्सवात 55 हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत. कला-क्रीडा महोत्सवातील विजेते, उपविजेते संघ आणि वैयक्तिक कलावंत आणि क्रीडापटूंना एकूण सहा हजारांपेक्षा अधिक प्रमाणपत्रे, 850 सुवर्ण, 850 रौप्य व 850 कांस्य पदके देण्यात येणार आहेत.