पालघर - गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरणी आज आणखी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या पाच जणांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) कोठडीत पाठवण्यात आले आहे. १३ मेपर्यंत त्यांना या कोठडीत ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणी आतापर्यंत ११५ जणांना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये ९ अल्पवयीन तरुणांचा समावेश आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील १०१ आरोपींवर काल डहाणू न्यायालयात सुनावणी करण्यात आली. या प्रकरणात यापूर्वी न्यायालयाने, दाखल तीन गुन्ह्यांपैकी, तिघांच्या हत्येच्या गुन्ह्यात (कलम ३०२) पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्याने, या गुन्ह्यात न्यायालयाने या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. उर्वरित दोन गुन्ह्यांपैकी खुनाचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा या गुन्ह्यात न्यायालयाने सर्व आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तसेच, या प्रकरणातील आणखी ९ आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली.