पालघर -भारतीय हवामान खात्याने १६ मेला महाराष्ट्र आणि गोवा या प्रदेशातील सागरी किनाऱ्यावर ताशी ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे वादळसदृश्य स्थिती होऊ शकते म्हणून सागरी किनारपट्टी येथील नागरिकांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. ही परिस्थिती पाहता खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या बोटी अखेर समुद्र किनाऱ्यावर दाखल झाल्या आहेत.
समुद्र किनाऱ्यावरील दृश्य स्थानिकांना प्रशासनाचा इशारा -
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत समुद्र खवळलेला राहणार आहे. समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे आधीच मासेमारी गेलेल्या बोटींना पुन्हा माघारी फिरण्याचे आवाहन करण्यात येत होते. या आवाहनाला प्रतिसाद देत विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर पाचशेहून अधिक मच्छिमार बोटी किनाऱ्यावर दाखल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तर हे वादळ कधीही पालघर किनारपट्टीला धडकणार असल्याने प्रशासनाने येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हेही वाचा -तौक्ते वादळ : समुद्रकिनारी, चौपाट्यांजवळ अग्निशामक दलासह ९३ लाइफगार्ड सज्ज