पालघर - तारापूर समुद्रकिनारी मच्छीमारीसाठी लावलेल्या जाळ्यात एक फिनलेस पॉरपॉईझ मासा अडकला. मच्छिमार जगदीश पंढरीनाथ विंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या माशाची जाळ्यातून सुटका करून त्यास सुखरूप समुद्रात सोडून जीवदान दिले आहे.
पॉरपॉईझ माशाला मच्छिमारांनी दिले जीवदान धरण पद्धतीच्या जाळ्याने केली जाते पारंपारिक मासेमारी -
जिल्ह्याला विस्तृत असा समुद्रकिनारा लाभला असून येथे मोठ्या बोटींमधून मासेमारी करण्यात येते. त्याचप्रमाणे काही पारंपरिक मच्छीमार समुद्रात काही दूरवर धरण जाळी उभारून त्याद्वारे मच्छीमारी करतात. या धरण जाळ्यांमुळे समुद्राला ओहोटी आल्यावर भरतीच्या पाण्याबरोबर आलेले छोटे- मोठे मासे या जाळ्यात अडकतात. अशा प्रकारे या जाळ्यांच्या माध्यमातून पारंपरिक मच्छीमार आजही मच्छीमारी करतात.
हेही वाचा -पालघरमधील अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिकेची कार्यालयातच हत्या
जाळ्यात अडकला फिनलेस पॉरपॉईझ मासा -
तारापूर येथील मच्छीमार जगदीश पंढरीनाथ विंदे यांनी अशाच प्रकारचे धरण जाळे मच्छिमारीसाठी समुद्रात लावले होते. समुद्राला ओहोटी आल्यानंतर त्यांच्या या जाळ्यात एक मासा अडकल्याचे व आपल्या सुटकेसाठी प्रयत्न करीत असल्याचे विंदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आले. मासा सुटकेच्या प्रयत्नात खूप दमला होता. मच्छिमार विंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या फिनलेस पॉरपॉईझ माशाची धरण जाळ्यातून सुखरूप सुटका करत त्याला एका छोट्या जाळ्यात घेतले. त्यानंतर फिनलेस पॉरपॉइज माशाला सुखरूप समुद्रात सोडून जीवदान दिले. समुद्राच्या पाण्यात जाण्याच्या काही वेळातच हा मासा समुद्रात विहार करत दिसेनासा झाला.
फिनलेस पॉरपॉईज -
फिनलेस पॉरपॉईझ जातीच्या माशाला लहान आकाराचा व्हेल मासा, गाधा मासा, असेही म्हटले जाते. या माशाची लांबी साधारणतः 1.2 ते 1.8 मीटर, तर वजन सुमारे ४५ किलोग्रॅमपर्यंत असते. प्रवासी पक्षांप्रमाणे हे समुद्री सस्तन प्राणी देखील हिवाळ्याच्या वेळी भारतीय उष्णकटीबंधीय समुद्रात हिवाळ्याचा काळ घालवण्यासाठी येत असतात. हे मासे मुख्यतः उत्तर अटलांटिक महासागर, उत्तर समुद्र, बाल्टिक समुद्रात, तसेच भारताच्या सागरी किनार्यावर आढळतात.
हेही वाचा -'धूम स्टाईल' बेततेय जीवावर; मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोघांचा मृत्यू