पालघर -अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांसोबतच मच्छिमारांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कित्येक दिवस मच्छिमारांच्या बोटी समुद्रातच गेल्या नसल्याने, मच्छिबाजारात मासळीचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे बाजारात उपलब्ध होणारी मासळी साहजिकपणे महाग झाली आहे. या सर्वाचा फटका मच्छिमारांना तर बसला आहेच, मात्र चवीने मासे खाणाऱ्या खवय्यांनाही बसला आहे.
आधी अवकाळी पावसाचा तडाखा, आणि त्यानंतर आलेली क्यार आणि महा चक्रीवादळे, यामुळे सुमारे चार महिने पालघरच्या समुद्रातील मासेमारी बंद राहिली. ऑगस्ट ते ऑक्टोबर हा मच्छिमारांसाठी मोक्याचा काळ असतो. मात्र, यावेळी नेमक्या याच काळात मासेमारी बंद राहिल्यामुळे, मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.