पालघर- मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी उसरणी येथील मच्छिमार बोटींचे नुकसान झालेल्या घटनास्थळाला भेट दिली आहे. त्यांनी नुकसानग्रस्त मच्छिमारांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार हुसेन दलवाई, खासदार राजेंद्र गावित, आमदार राजेश पाटील, आमदार श्रीनिवास वनगा जिल्ह्यातील मच्छिमार संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
'देशमुख सरकारच्या काळात मच्छिमारांसाठी सर्वात मोठे पॅकेज'
ज्या मच्छिमारांचे नुकसान झाले आहे, अशांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल असे यावेळी मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. तसेच ठिकठिकाणी समुद्र किनाऱ्यालगत केळीच्या, नारळाच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. त्याच्याही नुकसान भरपाईबाबत सरकारला सांगणार असल्याचेही शेख यांनी सांगितले. विलासराव देशमुख यांचे सरकार असताना मच्छिमारांसाठी सर्वात मोठे पॅकेज जाहीर केले होते. त्यानंतर आता मच्छिमारांना मदत करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करीत आहे, असेही शेख म्हणाले.