पालघर- तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, भाभा अणु संशोधन केंद्र, या दोन्ही केंद्रामधील सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे कर्मचारी यांना टॅप्स रुग्णालयात वैद्यकीय सुविधा येते. या टॅप्स रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील 56 वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णालयात फक्त अत्यावश्यक रुग्णांसाठी सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
पालघर : कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने टॅप्स रुग्णालयातील 56 अधिकारी-कर्मचारी क्वारंटाईन - टॅप्स हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्ण
कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने टॅप्स रुग्णालयातील 56 अधिकारी- कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.यामुळे फक्त रुग्णालयात अत्यावश्यक रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.
तारापूर येथील एमपीसीआयएल, बीएआरसी व सीआयएसएफ यांच्या आजी- माजी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या आरोग्य सेवेच्या केंद्रामध्ये मुंबई मालाड येथून एक लाभार्थी स्त्री दाखल झाली होती. या महिलेला कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्याने या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 56 अधिकारी- कर्मचारी यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. परिणामी या रुग्णालयात सध्या फक्त अत्यावशक सेवा सुरू ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या रुग्णालयावर अवलंबून नागरिकांना पुढील आठवड्यापर्यंत गैरसोईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
बीएआरसी व टॅप्स परिसरातून आतापर्यंत पाच रुग्णांना कोरोना आजार झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू आहेत. टॅप्स रुग्णालयात विलगीकरण केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे टप्प्याटप्प्याने घशाचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठवले जात आहेत. हे नमुने निगेटिव्ह आल्यानंतरच टॅप्स रुग्णालयातील हे सर्व वैद्यकीय कर्मचारी कामावर पूर्ववत रुजू होऊ शकतील, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत खंदारे यांनी सांगितले आहे.