मोहन मोडक यांची प्रतिक्रिया पालघर :जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कुर्लोड ग्रामपंचायत हद्दीतील एका पाड्यातील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाड्यावरील गर्भवती महिला सुरेखा लहू भेगडे ही सात महिन्यांची गरोदर आहे. आज सकाळी सुरेखा यांना अचानक त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेला नेण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे महिलेला पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करवा लागला आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने महिलेला डोलीच्या साहाय्याने नदी पार करावी लागल्याची घटना उघडकीस आली.
पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास : सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला सकाळी उलट्या होऊ लागल्या होत्या. या महिलेला नांदगाव रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी रस्ता नव्हता. सुरुवातीला महिलेला पाड्यापासून डोली बनवून डोंगर दऱ्यातून नदीच्या किनाऱ्यावर आण्यात आले. मात्र, नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला होता. तरी देखील ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता गरोदर महिलेला पुराच्या पाण्यातून आरोग्य केंद्रात नेले.
आदिवासींच्या नशिबी मरणयातना :या पाड्यांवर जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. तसेच आरोग्य शिक्षणाच्या कोणत्याही सुविधा नाहीत, अशी प्रतिक्रिया गावच्या उपसरपंचाने दिली आहे. आम्हाला दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता नाही. नदीवर पूल देखील नाही. अनेक वर्षांपासून आम्ही पुलाची मागणी करतो आहोत. मात्र, आमच्याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप उपसपंच मोहन मोडक यांनी केला आहे. शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे तीन ते चार महिने आमची मुले शाळेतच जात नाहीत, अशी धक्कादायक माहिती मोडक यांनी दिली. तसेच शिक्षक देखील चार महिने शिकवण्यासाठी पाड्यावर येत नसल्याचा आरोप उपसरपंच मोडक यांनी केला आहे. प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आदिवासींच्या नशिबी आजपर्यंत मरणयातना येत असल्याचे कुर्लोड ग्रामपंचायतीचे उपसरपंच मोहन मोडक म्हटले आहे.
पिंजाळ नदीवर पूल बांधण्याची मागणी : मोखाडा तालुक्यातील कुर्लोड ग्रामपंचायत हद्दीतील शेंड्याचा पाडा, आंबेपाडा, रायपाडा, जांभूळपाडा असे चार पाडे आहेत. या पाड्यांची लोकसंख्या 500 हून अधिक आहे. या पाड्यांमध्ये जाण्यासाठी तसेच गावाबाहेर पडण्यासाठी पिंजाळ नदीचे पात्र पार करावे लागते. मात्र नदीवर पूल नसल्याने नदीच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास स्थानिकांना करावा लागत आहे. पिंजाळ नदीवर पूल बांधण्यात यावा अशी नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा -"बुडत्याला काडीचा आधार", ही म्हण खरी ठरवणारी पालघरच्या पुरातील थरारक घटना..!