पालघर -सोसायटीत नियमीत पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने काहीतरी करावे. अन्यथा यापुढे सोसायटी कर्जे भरली जाणार नाहीत, असा पवित्रा जिल्ह्यातील गोऱ्हे सेवा सहकारी सोसायटीतील नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकरी वर्गाने घेतला आहे. या पवित्र्यामुळे सेवा सहकारी सोसायट्या अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालघर जिल्ह्यातील महापुराने व महाचक्रीवादळाने भात पीक उत्पादक शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर तत्कालीन मंत्र्यांचे दौरे आणि पंचनामे असे सोपस्कार झाले. अखेर नव्या राज्य सरकारने २ लाखांच्या आत कर्जमाफीची घोषणाही केली खरी आणि थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, या कर्जमाफीवर पालघरमधील नियमीत पीककर्ज भरणारा शेतकरीवर्ग नाराज झाला आहे. दरम्यानच्या काळात शेतकरीवर्गाने पालकमंत्री तथा कृषीमंत्री दादा भिसे यांना याबाबत सोसायटीच्या लेटर पॅडवर निवेदन देण्यात आले आहे.
आम्ही काटकसर करून तर, कधी दागिणे गहाण ठेवून नियमीत कर्ज भरत असतो. पण, यापुढे आम्ही कर्ज भरणार नाही. आम्ही कर्जमाफीच्या विरोधात नाही पण आमच्यासाठी काहीतरी शासनाने करावं. पीकविमा उतरलेला आहे परंतु, या नुकसानभरपाईत तोही मिळत नाही अशी खंतही शेतकरीवर्ग व्यक्त करीत आहेत.