पालघर (वाडा) -पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अडचणीत आला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची लागवडीची कामेही रखडली आहेत. यामुळे नापिकी ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.
पालघर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची एखादी सर येते. तर कुठे कोरडेपणा दिसून येतो. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील हळवे जातीच्या भात पीकाची लागवड केली आहे. आता या पिकाला पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. पण येथे पावसाअभावी पिके करपून शेतकऱ्यांच्या पदरी नापिकी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पालघरमध्ये पावसाने दडी दिल्याने खरीप हंगाम अडचणीत, शेतकरी चिंतातूर पालघर जिल्ह्यासह पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा पावसाची वाट पाहत आहे. खरीप हंगाम पुढे ढकलला जाईल या भीतीने शेतकरीवर्गाने पेरणी केली. मात्र भात पेरणी केलेल्या रोपांना पाणी नाही. हंगाम साधण्यासाठी काहींनी कमी दिवसांची भात रोपे लावली. मात्र ऐन लागवडीच्या हंगामातच पावसाने दडी दिली आहे.
वाडा तालुक्यात 15 जुलै ते 18 जुलैपर्यंत प्रत्येकी 2 मिमी, 4 मिमी, 13 मिमी, 4 मिमी, असा पाऊस झाला आहे. येथील भात पिकांना पावसाची गरज असतानाच पावसाने दडी दिली. त्यामुळे लागवड केलेले भातपीक पावसाअभावी करपले तर शेतकरीवर्गावर नापिकी ओढावू शकते, अशी प्रतिक्रिया डाहे येथील शेतकरी जगदीश कोकाटे यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना दिली.