वसई (पालघर) - वसई विरारमधील बहुतांश ठिकाणच्या भागात भात पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव आहे. असे असतानाच वसई पूर्वेतील खानिवडे येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याने नैसर्गिक खताचा वापर करून चक्क पाच ते सहा फूट उंचीचे भात पीक घेतले आहे.
वसई पूर्वेच्या ग्रामीण भागात दरवर्षी भातशेतीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यात उगवणारे पीक हे साधारण अडीच ते तीन फूट उंचीचे असते. परंतु विश्वनाथ कुडू आणि त्यांच्या परिवाराने एकदम साध्या पद्धतीने भात पिकांची लागवड केली होती. सेंद्रिय खतावरच ही भात शेती फुलविली असून भात पिकाची उंची ही पाच ते सहा फूट इतकी वाढली आहे. याला आलेली कणसे देखील चांगलीच भरली आहेत. याआधी येणाऱ्या कणसांना १२० ते १५० दाणे येत होते. यावर्षीच्या कणसाला साधारणपणे २५० ते ३०० दाणे असल्याचे कुडू यांनी सांगितले आहे. यामुळे उत्पन्न सुद्धा चांगले निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.