पालघर - आदिवासी बांधवांमध्ये कोरोनासंदर्भात अनेक गैरसमज तसेच भीती आहे. हे गैरसमज आणी भीती दूर करण्याचे काम चित्रकारांनी वारली चित्रकलेच्या माध्यमातून केले आहे. लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी तसेच लसीकरणाचा संदेश चित्रकलेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. ११ वीत शिकणाऱ्या तन्वी वरठा, सुचिता कामडी या दोन विद्यार्थीनींनी आदिवासी बोली भाषेचा वापर करून, साकारलेल्या वारली चित्रांमुळे आदिवासी समाजात कोरोनाविषयी जनजागृती निर्माण होण्यास मदत होत आहे.
पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून, आदिवासी समाजात कोरोना आजाराविषयी भिती आणि गैरसमज आहेत. त्यामुळे ते अनेकवेळा कोरोनाचे लक्षणे दिसत असून सुद्धा डॉक्टरकडे जात नाहीत. तसेच अनेक वेळा निदान न झाल्याने चुकीच्या पद्धतीने उपचार केले जातात. यातून हा आजार बळावतो. त्याचप्रमाणे कोरोना लसीकरणावरून देखील आदिवासी समाजात अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे कोरोना लसीकरणाला देखील फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.