पालघर - सामाजिक वनीकरण विभागात मजुरांनी केलेल्या कामाचे दीड वर्षांपासून वेतन नाही. थकीत वेतनाच्या मागणीसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मजुरांनी आदिवासी एकता मित्र मंडळ यांच्या माध्यमातून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 15 फेब्रुवारीला लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. पालघर जिल्ह्यातील मनोर वाडा या महामार्गावर टेन येथे सामाजिक वनीकरण विभागाचे स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान केंद्र आहे.
वर्षभराचे वेतन थकले
या उद्यान केंद्रात परिसरातील 30 महिला व पुरूष मजूर या परिसरातील कामासाठी जातात. गेल्या दीड वर्षांचे मजूरवर्गाचे वेतन थकले आहे. थकलेले वेतन मिळविण्यासाठी वनविभागाकडे मागणी-निवेदनेही सादर केली आहेत. मात्र त्यांना अजूनही वेतन मिळत नाही.