वसई (पालघर)वसईतील एका भातगिरणी मालकाला जानेवारी महिन्याचे वीजबिल चक्क 80 कोटी रु. एवढे प्रचंड आले आहे. वीजबिल पाहून या भातगिरणी व्यवसायिकाला धक्का बसला आहे. त्याने याबाबत महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, उडवाउडवीची उत्तरे मिळाली. गणपत नाईक असे या गिरणी व्यवसायिकाचे नाव आहे, दरम्यान हे वीजबिल सोशल मीडियावर व्हायरल होताच महावितरण अधिकाऱ्यांकडून या बिलाची दखल घेण्यात आली आहे. तांत्रिक चुकीमुळे हे बिल आल्याची सारवासारव करत, महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून नाईक यांना 80 हजारांचे बिल देण्यात आले.
अबब! भातगिरणी व्यवसायिकाला पाठवले तब्बल 80 कोटींचे वीजबिल
वसईतील एका भातगिरणी मालकाला जानेवारी महिन्याचे वीजबिल चक्क 80 कोटी रु. एवढे प्रचंड आले आहे. वीजबिल पाहून या भातगिरणी व्यवसायिकाला धक्का बसला आहे. त्याने याबाबत महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, उडवाउडवीची उत्तरे मिळाली. मात्र बिल सोशल मीडियावर व्हायरल होताच या बिलाची दखल महावितरण अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.
वीजबिल सोशल मीडियावर व्हायरल
नालासोपारा पश्चिमेला असलेल्या वंडा-मर्देस परिसरामध्ये गणपत नाईक यांची भातगिरणी आहे. त्यांचा मुलगा सतीश याचा तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला असून, भातगिरणीतील वीज मिटर मुलाच्या नावे आहे. जानेवारी महिन्याचे वीजबिल त्यांना सोमवारी देण्यात आले, हे बिल तब्बल 80 कोटी 13 लाख 89 हजार 600 रु. होते, बिलावरील रक्कम पाहून नाईक यांना धक्काच बसला, एवढे बिल आल्याने ते प्रचंड तणावात होते, त्यांनी याबात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र तुम्ही वीजबिलाची प्रत सादर करा, तपासून सांगू, असे उडवाउडवीचे उत्तरे त्यांना देण्यात आले, मात्र हे वीजबिल सोशल मीडियावर व्हयरल होताच, अधिकाऱ्यांनी या बिलाची दखल घेत, तांत्रिक चुकीमुळे हे बिल पाठवण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच हे बिल बदलून नाईक यांना 80 हजारांचे नवे बिल पाठवण्यात आले. मात्र या प्रकाराने पुन्हा एकदा वीज विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.