पालघर/ नालासोपारा : नालासोपारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गेलेल्या एका ६३ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र, कोरोनाची लस घेण्यापूर्वी नावनोंदणीसाठी रांगेत उभे असताना उन्हामुळे चक्कर आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका डॉक्टरांनी दिली. नालासोपारा येथील पाटणकर पार्क प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल ३ दिवसांपूर्वीच आयुक्तांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. पण, याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच या वयोवृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. पाटणकर पार्क परिसरात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मनपाने लसीकरण केंद्र सुरू केले आहे. यात कोरोनाची लस घेण्यासाठी हरीशभाई पांचाळ (६३) हे शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास आले होते. ते नाव नोंदणी करण्यासाठी रांगेत उभे असताना त्यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली पडले. त्यांना जवळच्या महानगरपालिका रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
नालासोपाऱ्याच्या लसीकरण केंद्राबाहेर वयोवृद्ध नागरिकाचा मृत्यू प्रकरण - लसीकरण केंद्राबाहेर वयोवृद्ध नागरिकाचा मृत्यू प्रकरण
नालासोपारा येथील पाटणकर पार्क प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल ३ दिवसांपूर्वीच आयुक्तांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. पण, याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच या वयोवृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. पाटणकर पार्क परिसरात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मनपाने लसीकरण केंद्र सुरू केले आहे.
या लसीकरण केंद्राची जागा अत्यंत लहान व लसीकरणासाठी पूरक नाही, त्यामुळे लसीकरणाला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार परिवहन सदस्य बाबुसिंग पुरोहित यांनी आयुक्तांना १० मार्चला पत्राद्वारे केली होती. तसेच वयोवृद्धांना तासन् तास रांगेत उन्हात उभे राहावे लागते, त्यांना बसण्यासाठी खुर्च्यांचीही व्यवस्था नसल्याचे तक्रार पत्रात नमूद आहे. या ठिकाणी किमान प्राथमिक सुविधा आणि रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध असती, तर पांचाळ यांचा जीव वाचला असता, असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने
नालासोपारा पश्चिम येथील आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्रात आलेल्या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे त्यांच्या मित्रा सोबत गप्पा मारत उभे असताना चक्कर येऊन खाली कोसळले. त्यावेळी आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी तुळींज येथील रुग्णालयात दाखल केले असता या रुग्णांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर झाले आहे. तरी सदरची घटना ही लसीकरणामुळे व महापालिकेच्या उपचारामुळे झाली नसल्याचे पालिकेने सांगितले आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी लस ही सुरक्षित असून कोणतीही भीती न बाळगता लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.