पालघर/विरार - पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी करत असलेल्या ईडीने हितेंद्र ठाकूर व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या नामांकित विवा ग्रुप कंपनीच्या विरार येथील कार्यालयावर शुक्रवारी सकाळी छापा टाकला.
ईडीने या कारवाईत तब्बल नऊ तास चौकशी केली. चौकशीअंती हितेंद्र ठाकूर यांचे चुलत बंधू दीपक ठाकूर यांचा मोठा मुलगा मेहुल ठाकूर व मदन गोपाल चतुर्वेदी यांना अटक करण्यात आली आहे. मेहुल ठाकूर विवा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. मदन गोपाल चतुर्वेदी हे या कंपनीचे संचालक आहेत.
ईडीकडून विवा ग्रुपची नऊ तास चौकशी, मेहुल ठाकूरसह मदन गोपाल यांना अटक पाच कार्यालयांवर छापे, तब्बल नऊ तास चौकशीनंतर अटक
शुक्रवारी नऊ तास केलेल्या चौकशीनंतर ईडीने या दोघांना ताब्यात घेऊन मुबंई येथील कार्यालयात नेले होते. त्यानंतर रात्री उशिरा दोघांना अटक करून शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी विरार येथील विवा ग्रुपच्या पाच कार्यालयांवर छापे टाकले होते. विवा ग्रुप बहुजन विकास आघाडीच्या आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कुटंबीयांशी संबंधित आहे.
पीएमी अणि येस बँकेकडून एचडीआयएलने घेतलेले कर्ज अवैधरीत्या विवा कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांत वळवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले होते.
विरार येथील विवा समूहाचे नोंदणीकृत कार्यालय, समूहाशी संबंधित एका व्यक्तीचे विरार येथील निवासस्थान, अंधेरी येथील विवा समूहाचे कार्यालय आणि विवा समूहाच्या सल्लागारांची चेंबूर, जुहू येथील निवासस्थाने या पाच ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होते. या कारवाईत 73 लाखांची रोख व तपासाशी संबंधित कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आली होती.
हेही वाचा -गोंदिया : अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी 105 वाहनांचे परवाने निलंबित
काय आहे प्रकरण?
एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान सुमारे साडेसहा हजार कोटींच्या पीएमसी बँक घोटाळ्यात आरोपी आहेत. पीएमसी बँकेकडून घेतलेल्या कर्जापैकी 160 कोटी रुपये त्यांनी विवा आणि तिच्या उपकंपन्यांत अवैधरीत्या वळते केले आहेत. हे अवैध व्यवहार एचडीआयएची उपकंपनी गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून घडले, असा ईडीचा संशय आहे. राऊत यांची सुमारे 72 कोटी रुपयांची मालमत्ता अलीकडेच ईडीने जप्त केली आहे.
असा आहे संशय!
पीएमसी बँक घोटाळ्याचा तपास करताना वाधवान यांनी, येस बँकेने मॅक स्टार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मंजूर केलेल्या 200 कोटी रुपयांच्या कर्ज व्यवहारातही गैरव्यवहार केल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. मॅक स्टार कंपनीच्या अंधेरी येथील दोन मालमत्ता एचडीआयएलने विवा कंपनीची उपकंपनी विवा होल्डिंगकडे वळवल्या आहेत. त्यासाठी विवा होल्डिंग कंपनीने या मालमत्ता 34 कोटी 36 लाख रुपयांना खरेदी केल्याचा आभास निर्माण करण्यात आला. ही रक्कम 37 धनादेशांद्वारे देण्यात आली, असेही चित्र उभे करण्यात आले. प्रत्यक्षात यापैकी एकही धनादेश वटलेला नाही. तसेच विवाच्या खात्यावरूनही या रकमेचे व्यवहार झालेले नाहीत. विवा कंपनीच्या ताळेबंदातही मॅक स्टारच्या मालमत्ता खरेदी केल्याचा उल्लेख नाही. हे गैरव्यवहार उघड झाल्यानंतर शुक्रवारी ईडीने विवा समूहाशी संबंधित पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.
हेही वाचा -गेल्या वर्षी कोरोनापेक्षा अधिक मृत्यू रस्ते अपघातांमुळे; वाहतूक उपायुक्तांची माहिती