पालघर -जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात मध्यरात्रीच्या सुमारास तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता 4.0, 3.6, 2.8 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्याने भूकंपाच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडले.
पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, किनारपट्टीचा भागही हादरला - पालघर भूकंप
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात नोव्हेंबर 2018 पासून या भागात भूकंपाचे धक्के बसण्याचे सत्र सुरू झाले आहे. पावसाळ्याच्या दरम्यान धक्के बसत नव्हते. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून हे सत्र पुन्हा सुरू झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जिल्ह्यात वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने डहाणू, तलासरी परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. डहाणू, तलासरी भागात रात्री 10.33 वाजता 2.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंपाचा धक्का बसला. मध्यरात्री 11.41 वाजता 4.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा व 12.05 वाजता 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला. मध्यरात्री झोपेत असताना अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक खडबडून जागे झाले व भीतीने घराबाहेर पडले होते. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.
दरम्यान, या भागात सारखा पाऊस सुरू होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतलीय. तसेच या भागातील धामणी, कवडास, कुर्झे येथील धरणे भरली असून काही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यातच भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.