पालघर- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना, नागरिक मात्र घराच्या बाहेर पडण्यात अतिउत्साह दाखवित आहेत. शासनाने नागरिकांना घरात राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तरीपण नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. नागरिकांना समजून सांगण्याचे सर्व पर्याय संपले असल्याने आता प्रतिकात्मक यमराज रस्त्यावर उतरला आहे. यमराजच्या भीतीने तरी नागरिक घरात बसतील हा यामागचा उद्दश ठेवण्यात आला आहे.
'नियम पाळा अन् यम टाळा'... हेही वाचा-लॉकडाऊन : 80 वर्षाच्या आजीची तब्बल 3 दिवस पायपीट, चालल्या 'इतके' अंतर
कोरोना विषाणू हा संसर्गजन्य असल्यामुळे त्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी घरात राहण्याचा सल्लाही सरकारकडून देण्यात आलेला आहे. मात्र, नागरिक या ना त्या कारणाने घराच्या बाहेर पडत आहेत. या सर्व नागरिकांना घरी पाठविण्यासाठी पोलिसांनी सर्व प्रयत्न केले आहेत. तरीही नागरिक कुठल्याच प्रकारचे आदेश ऐकण्यास तयार नसल्याने नागरिकांची रस्त्यावरील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
नागरिकांना मृत्यूची भीती वाटते. त्यामुळे प्रतिकात्मक यमराज तयार करुन रस्त्यावर फिरवला जात आहे. जे नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. त्यांना अडवून त्यांना घरी परत जाण्याचा सल्ला यमराज देत आहे. 'नियम पाळा आणि यम टाळा' अशा सल्ला यमराज देत आहे.