पालघर -मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या मारलेल्या पावसाने जोरदार पुनरागमन केलं. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. परिणामी नाले ओसंडून वाहत आहेत. अशात नाल्यात एक कार चालकासह वाहून चालली होती. तेव्हा तेथील स्थानिकांनी व रिक्षाचालकांनी प्रसंगावधान दाखवत कारचालकाच्या मदतीसाठी धाव घेतली आणि पाण्यात वाहून चाललेली कार, चालकासह पाण्यातून बाहेर काढली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
पालघर जिल्ह्यात चांगलाच पाऊस बरसला या पावसामुळे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले तर काही नाले ओसंडून वाहत होते. अशात केळवे रोड रेल्वे स्टेशनजवळ पुलाचे काम सुरू आहे. येथील पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी यापूर्वी असलेल्या रेल्वे पुलाखालूनच जाण्यासाठी रस्ता आहे. मात्र पाऊस जोरात असल्याने येथील नाल्याला पूर आला. नाल्याला पूर आला असताना देखील एका कार चालकाने स्वतःचा जीव धोक्यात घालत कार पूराच्या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न केला.