पालघर - मुसळधार पावसामुळे बुधवारी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. यावेळी एका वृद्ध प्रवाशाची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यासाठी पालघर रेल्वे स्थानकाच्या फलाटावर रिक्षा धावताना पाहायला मिळाली.
वृद्धाचा जीव वाचवण्यासाठी रेल्वेस्थानकात चालवली रिक्षा; पोलिसांकडून चालकावर गुन्हा दाखल - रेल्वेस्थानकाच्या फलाटावर रिक्षा
मुसळधार पावसामुळे बुधवारी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. यावेळी एका वृद्ध प्रवाशाची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यासाठी पालघर रेल्वे स्थानकाच्या फलाटावर रिक्षा धावताना पाहायला मिळाली.
पालघरमधील मासवण भागात घरगुती गणपतीच्या दर्शनासाठी गेलेले कुटुंब मुंबईतील घरी परत येत होते. त्यावेळी कुटुंबातील एका वृद्ध व्यक्तीला अचानक अस्वस्थ वाटू लागले. रेल्वे स्थानकावर असलेल्या डॉक्टरांना बोलवण्यात आले. मात्र, 15 मिनिटे उलटूनही डॉक्टर आले नाहीत. तेव्हा एका नर्सने येऊन वृद्धाला शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून फलाटावरील चिकू विक्रेते जयवंत चौहान यांनी रिक्षा थेट फलाटावर बोलावली. वृद्धाला रिक्षातून पुढील उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी रिक्षाचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्याचे सर्व प्रवाशांनी कौतुक केल्याचे पहायला मिळाले.
दरम्यान, रेल्वेस्थानकात रिक्षा चालवल्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, असे या रिक्षाचालकाला रेल्वे पोलिसांमार्फत सांगण्यात आले आहे. त्यामुळे, आपण केलेल्या मदतीने असा गुन्हा दाखल होणार असेल, तर यापुढे कुणालाही मदत करताना आपल्याला विचार करावा लागेल, असे मत रिक्षाचालकाने व्यक्त केले आहे.