पालघर- तारापूरच्या तारापूर औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधून निघणारे सांडपाणी आणि रासायनयुक्त पाणी राजरोसपणे परिसरातील शेती तसेच नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. त्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत दुषित झाले असून नागरिकांना अनेक आजार जडू लागले आहेत.
तारापूर औद्योगिक वसाहतीत साडेबाराशेहून अधिक कंपन्या असून, या कंपन्यांमधून निघणारे रसायनयुक्त सांडपाणी राजरोसपणे परिसरातील नागरिकांच्या शेतीत तसेच नैसर्गिक नाल्यांमधून परिसरात सोडले जात आहे. त्यामुळे बोईसरसह परिसरातील आठ ते दहा गावांमधील पाण्याचे स्रोत दूषित झाले आहेत. दूषित झालेल्या पाण्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सर्दी, ताप, डोकेदुखी, घसा दुखणे, अंगाला खाज, सांधे दुखी यासारख्या अनेक आजारांना ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहे.