पालघर-कोरोनाकाळात अनेक वैद्यकीय अधिकारी कर्मचारी कोणताही सण साजरा न करता अहोरात्र सेवा करत आहेत. दिवाळीत अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना कर्मचारी आणि इतरांकडून मिठाई भेट देण्यात येते. परंतु पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी कोविड सेंटरमधील अधिकारी-कर्मचारी व रुग्णांंना मिठाई वाटप करत अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.
पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी मिठाई, ड्रायफूट आदीची सर्व पाकीटे घेत विक्रमगड येथील रिव्हेरा कोविड सेंटर गाठले. जिल्ह्यात कोरोनाला आळा घालण्यास मागील सात महिन्यांपासून दिवसरात्र झटत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर, आरोग्यसेविका, कर्मचारी तसेच कोरोना बधित रुग्णांची त्यांनी भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट दिल्याने पुरेश्या तयारीत नसलेली सर्व यंत्रणा काहीशी गडबडली. मात्र, कोविड सेंटरमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना एकत्र बोलवत आपुलकीने त्यांची विचारपूस केली आणि आपल्या गाडीत ठेवलेले सर्व मिठाईचे बॉक्स त्यांच्या पुढे ठेवले. हे सर्व मिठाई, ड्रायफ्रूट वाटप करत अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. त्यामुळे या सर्व कोरोनायोद्ध्यांना आश्चर्याचा धक्का बसला.