पालघर -नालासोपारा पश्चिम निळेमोरे गावात शनिवारी रात्री ११ वाजता सेना-भाजप युतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या गाड्या अडवून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. शर्मा मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रदीप शर्मा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर नालासोपारा पश्चिम येथे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गेले होते. मात्र, निळेमोरे गावात मोठ्या संख्येने मुंबई पासिंगच्या गाड्या आढळल्याने गावकऱ्यांना विचारपूस केली. त्यावेळी एका गाडीतून प्रदीप शर्मा पैसे वाटप करण्यासाठी फिरत आहेत, असे सांगण्यात आले. त्यानंतर गावकरी व बविआच्या कार्यकर्त्यांनी शर्मा यांच्या गाड्या अडवल्या. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षक व इतर लोकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. शर्मा यांच्या गाडीत मतदारांना आमिष दाखवण्यासाठी पैसे असल्याचा संशय आल्याने पोलिसांना गाडीची तपासणी करण्याचे बविआच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यानंतर प्रदीप शर्मा यांच्या अंगरक्षकांनी बविआच्या कार्यकर्त्यांवर हात उगारला, असल्याचा आरोप असल्याचे बविआचे माजी उपमहापौर उमेश नाईक यांनी सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी शर्मा यांच्या २ वाहनांच्या काचा फोडून आपला संताप व्यक्त केला.
हे वाचलं का? - किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा; 'त्या' वक्तव्याबाबत धनंजय मुंडेंचे स्पष्टीकरण