पालघर - महाराष्ट्रात आतापर्यंत २५ सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या घटनांची महाराष्ट्र शासन व प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आजपर्यंत तत्काळ मदत, नुकसान भरपाई दिलेली नाही. शासकीय अधिकारी घटनास्थळाला भेटी देऊन चौकशी व तपास करतात. मात्र, अहवाल हा फक्त कागदावरच राहून पुढील कार्यवाही केली जात नसल्याची खंत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड यांनी व्यक्त केली.
'महाराष्ट्रात आतापर्यंत २५ सफाई कामगारांचा मृत्यू; प्रशासनाचे दुर्लक्ष' - सफाई कामगार
हाथीबेड हे पालघर व ठाणे जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या मृत्यूच्या घटनांच्या अनुषंगाने आयोगाच्या अध्यक्षांच्या सुचनेनुसार पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पालघर शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला
हाथीबेड हे पालघर व ठाणे जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूच्या घटनांच्या अनुषंगाने आयोगाच्या अध्यक्षांच्या सुचनेनुसार पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पालघर शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
गेल्या ३ मे रोजी नालासोपारा येथे सेफ्टी टँक साफ करताना सुनील ओमप्रकाश चवरीया (वय ३०), बिका कॅसन बुंबक (वय ३५), प्रदीप मिया सरोए उर्फ सरोस (वय ३४) या तीन सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या परिवाराला आजपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. तिन्ही मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील प्रत्येकी एकाला महानगरपालिकेतर्फे नोकरी दिली जाणार असून या नियुक्तीची पत्रदेखील तात्काळ देण्यात येत असल्याचेही हाथीबडे यांनी सांगितले. संबंधितांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याबाबतीत आवश्यक पावले उचलण्यासोबतच दोषींवर कारवाई करण्याबाबतीत अधिकाऱ्यांना निर्देश त्यांनी दिले. आयोग राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे याबाबतीत विचारणा करणार आहे. तसेच संबंधीत कुटुंबांना नुकसान भरपाई तसेच जबाबदारांविरोधात कारवाई करण्यासाठी आयोगाकडे आग्रह धरणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.